Monday, February 13, 2012

Jigsaw Puzzle


When I was a young boy, the well known anthropologist and writer of yesteryear, Irawati Karve, used to stay in a bungalow just across the road from my house. In those days, there were not many houses in that area on the outskirts of Pune, where I used to live. She was also related to me in a sort of way. Because of these reasons, I used to visit Karve's residence quite often. Iravati Karve, once had gone to US for some work. When she returned, she brought with her a giant Jigsaw Puzzle made up of 5000 pieces. In those days there were very strict rules and laws regarding bringing in any stuff from abroad inside India. She had therefore packed all the pieces in a small paper bag while bringing them in. Later, all these puzzle pieces were then just heaped on a carrom game board , which was placed on a large table. Since there was no picture available, which could give some hint about how the completed puzzle would look like, it was actually rather tough, to imagine how the puzzle would like, when completed. It was just a guess and try game to find out, which two pieces fitted together or which were the side pieces. Everyone in the house, including the guests, would try their hand on the puzzle, even if they just had ten or fifteen minutes to spare. As the days or weeks passed, the jigsaw puzzle picture, slowly started materializing before our eyes. Some blackish-brownish coloured pieces, which were thought by us as parts of the soil, actually turned out to be parts of a huge tree in the picture. Some blue pieces, which were segregated by us as definitely belonging to a corner of the sky, were actually from the sea shown in the picture. Some pieces, which we were sure that would be interconnected actually were from opposite corners. After two months, finally when the puzzle was completed, a picture, which was totally different from whet we had imagined all these days, emerged on the complete puzzle.

परवा सहज विचार करताना माझ्या लक्षात आले की अरे! आपले आयुष्य पण एक जिगसॉ पझलच आही की.! उमज आलेल्या वयापासून आपण त्याचे तुकडे लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. एक तुकडा जागेवर बरोबर बसला की वाटते की पुढचे चित्र आपल्याला उमगले आहे पण प्रत्यक्षात नंतर तयार होणारे चित्र काही निराळेच होते आहे. आई,वडील, भाऊ व  नंतरच्या काळात, पत्नी, मुले, नातवंडे यांची चित्रे, सलग अशा बर्‍याच तुकड्यांनी मिळून बनलेली आहेत.पण काही काही माणसे व त्यांच्या आठवणी ही एखाद- दुसर्‍याच तुकड्यावरच आहेत. ती परत कधीच या जिगसॉ पझलमधे दिसलेली नाहीत. पण ती माणसे असलेले पझलचे तुकडे जेंव्हा मी लावत होतो तेंव्हा ती माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती हे तितकेच खरे.
या जुळविलेल्या कोड्यावर एक नुसती नजर टाकली तरी डाव्या बाजूला तळाच्या तुकड्यावर चित्र दिसते आहे, माझ्या लहानपणातली अगदी घट्ट असलेली माझी मैत्रिण, गौरीचे. इरावतीबाई कर्व्यांची ही धाकटी मुलगी. मी रहात असलेल्या एरंडवण्याच्या माळावर आमची वस्ती चार पाच घरांची असल्याने लहान मुले अशी कितीशी असणार? चार पाच वर्षे वयापासून पुढची सात,आठ वर्षे आमची दोघांची मैत्री अभेद्य राहिली होती. रोज सकाळ संध्याकाळ, सुट्टीच्या दिवशी आणि मे महिन्यात तर दिवसभर आम्ही खेळत असू आणि हुंदडत असू. दिवाळीत किल्ला करणे, गणपतीची आरास करणे या सर्वात तिचा भाग असे. गौरी माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी त्यामुळे आम्हा मुलांच्या कोणत्याही भांडणात गौरी नेहमी माझी बाजू घेत असे. पुढे वय वाढले तेंव्हा मला सर्वात जवळची एक मैत्रिण आहे हे इतर मित्रांना सांगण्याची मला लाज वाटू लागली व आमची मैत्री दुरावत चालली. आठवी नववी पासून गौरी साड्या नेसू लागली आणि ती आपल्या मैत्रिणींच्यातच जास्त रमू लागली. मॅट्रिक झाल्यावर ती आई वडीलांच्या बरोबर अमेरिकेला गेली व आमची मैत्री पूर्ण दुरावली आपल्या शाळेतल्या, नोट्स काढलेल्या वह्या आठवणीने मला देणारी, कोणी शाळेत डोंगरी आवळा दिला तर चिमणीच्या दाताने त्याचा तुकडा माझ्यासाठी रुमालात आठवणीने आणणारी ही माझी मैत्रिण मला आयुष्यांत परत कधी भेटलीच नाही. परवा तिचे नंतरच्या आयुष्यांतले फोटो इंटरनेटवर सहज बघायला मिळाले आणि अक्षरश:पोटात कालवले. त्या फोटोतली व्यक्ती माझी कधी मैत्रिण होती हे स्वप्नात सुद्धा मला खरे वाटले नसते.
या चित्राच्या थोड्या वरच्या बाजूच्या चित्रात आहेत, महर्षि अण्णासाहेब कर्वे. माझ्या चित्रात असलेले अण्णा त्यावेळी नव्वदी ओलांडून केंव्हाच गेलेले होते. रोज सकाळी त्यांची ती कृश व ठेंगणी मूर्ती आमच्या घरी टाइम्स वाचायला येत असे. त्या वयात सुद्धा त्यांचे बोलणे अगदी स्पष्ट व खणखणीत असे. एकदा ते पेपर वाचत असताना मी तो उगीचच काढून घेण्याचा प्रयत्न केल्याने घरातल्या सर्वांचीच प्रचंड बोलणी खाल्ली होती. मॅट्रिक झाल्यावर मी एक छंद म्हणून व्हॉल्व्ह रेडिओंची जुळणी करत असे. अणांना असाच एक रेडिओ मी करून दिला होता. व पुढची काही वर्षे, त्यावरचे कार्यक्रम ते नियमित ऐकत असत. त्यांनी शंभरी पार केल्यावर, मुंबईला ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा एक भव्य सत्कार झाला होता. याच वेळी त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत, संयुक्त महाराष्ट्र झालेला आपल्याला पहायला आवडेल हे सांगितले होते. हा कार्यक्रम व त्याच वेळी झालेले इतर काही कार्यक्रम मला जवळून बघायला मिळाले होते हे मी नेहमीच माझे परम भाग्य समजतो.
या चित्राच्या जवळपासच एक चित्र आहे अधटराव सरांचे. आठवीनंतर, तांत्रिक अभ्यासक्रम निवडल्यामुळे, मी तांत्रिक विद्यालयात जाऊ लागलो. तिथे अधटराव सर आमचे मुख्याध्यापक होते. या आधी, पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजात, वर्कशॉपचे मुख्य असलेले अधटराव सर, या नवीन जबाबदारीवर बढती मिळून आले होते. अक्षरश: शून्यापासून सुरवात करून सरांनी फक्त तीन वर्षांत, पुण्यामधे घोले रस्त्यावर तांत्रिक विद्यालयाची दुमजली भव्य इमारत, सुसज्ज वर्कशॉपसकट उभारली होती. आणि याच वेळी आठवी ते अकरावीचे वर्ग, त्यांची प्रॅक्टीकल्स हे सर्व चालू ठेवूनच हे शक्य केले होते. सरकारी लाल फितीत यापैकी कोणताही प्रकल्प कधीच अडकला नव्हता. सुतारकामात मोर्टिस व टेनन जॉइंट पासून सुरवात करून त्यांनी आमच्याकडून डोव्हटेल जॉइंटपर्यंत सर्व काम पक्के करून घेतले होते. सुतारकाम, स्मिथी, फिटींग, टर्निंग, ड्रॉइंग जे म्हणाल ते त्यांनी आमच्याकडून इतके पक्के करून घेतले होते की पुढे आयुष्यांत मला कोणताही जॉब कसा करायचा याचा दुसर्‍यांदा विचार करायला लागला नाही. त्या काळी खाष्ट सासूची भूमिका निभाविण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री, इंदिरा चिटणीस या त्यांच्या पत्नी. शाळेच्या सहलींना त्या काहीतरी गंमतीदार गोष्टी सांगून आम्हाला हसवित असलेल्या मला आठवतात. कोणताही प्रकल्प कसा उभारायचा याचे एक प्रत्यक्ष शिक्षणच अधटराव सरांनी आम्हाला त्या चार वर्षांत दिले.
कॉलेजात जाऊ लागल्यावर, एका परिक्षेत आलेल्या थोड्या अपयशाने, आपला गणिताचा पाया जरा कच्चाच आहे याची जाणीव मला झाली.मित्रांशी बोलताना एका अफलातून व्यक्तीचे नांव मला कळले. मी दुसर्‍याच दिवशी बादशाही बोर्डिंगच्या समोरच्या बाजूस असलेल्या एका वाड्यामधे गेलो. एका अंधारलेल्या खोलीत एका कॉटवर ही व्यक्ती झोपलेली होती. मी भीतभीतच त्यांना माझ्या येण्याचे कारण सांगितले. माझे ग्रह त्या वेळी फारच उच्चीचे असावेत कारण गो.म.जोशी सरांची मला लगेच उद्यापासून शिकायला ये म्हणून अनुमती मिळाली. गो.म इतका हुशार आणि तर्कट माणूस मी परत कधी बघितला नाही.एकाच वेळी इंटर सायन्स, गणितात एम.ए.करणारा व संस्कृत शिकणारा अशांना ते सहज शिकवित. खोलीच्या एका बाजूला गो.म. कॉटवर झोपलेले आणि आम्ही आठ दहा जण खाली जाजमावर बसलेले असा आमचा क्लास चाले. कोणत्याही दिवशी अचानक चाचणी घेणे, दुसराच भाग शिकविणे वगैरे क्लुप्त्यांनी त्यांनी माझा गणिताचा पाया इतका पक्का करून घेतला की दुसर्‍याच वर्षी आमच्या कॉलेजात मला सर्वाधिक गुण मिळाल्याचे स्मरते. गो.म. बोलण्यात प्रचंड फटकळ ! एक मुलगी एक दिवस स्कर्ट घालून आल्याने तिची जात कोणती व तिचा वेष कोणता यापर्यंतचा सर्व उद्धार त्यांनी केल्याचे मला स्मरते. अर्थात वर्गातील बसण्याच्या जागेत एक मुलगी स्कर्ट घालून बसली तर बाकीच्यांना खूपच अडचणीने बसावे लागेल हे त्यांच्या रागविण्याच्या मागचे मुख्य कारण असावे. वर्गात त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न येणे हा तर अक्षम्य असाच गुन्हा असे. त्यामुळेच आमचा अभ्यास इतका तयार असे की आम्ही परिक्षा कधीही देऊ शकत होतो. मी घिसाड्याचा अभ्यासक्रम उगीच निवडला आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.
अशाच एका दुसर्‍या उल्लेखनीय व्यक्तीचे चित्र, माझ्या पझलमधे एका तुकड्यावर आहे. ते म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटमधल्या आमच्या इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख असलेले प्रो.चंद्रशेखर अय्या यांचे. जाडगेली व बुटकी शरीरयष्टी, डोक्याला टक्कल, असे दिसणारे प्रो अय्या यांच्री, प्रथमदर्शनी फारशी छाप पडत नसे. उच्च शिक्षणार्थी विद्यार्थी आणि आमचे उच्च पदवीविभूषित प्राध्यापक यामुळे आमच्या इन्स्टिट्यूट मधील वातावरण एकंदरीत वरच्या हवेतच असे. या वातावरणात घट्ट जमिनीवर पाय रोवलेले प्रो. अय्याच असत. त्यामुळे आम्हाला मिळणारे शिक्षण, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपयुक्त होईल की नाही हे ते मोठ्या कटाक्षाने बघत. भारत इलेक्ट्रॉनिक्स, नॅशनल एअरॉनॉटिकल प्रयोगशाळा येथे विद्यार्थ्यांना नेणे. संशोधनासाठी किंवा प्रकल्पांसाठी कोणतेतरी जडबंबाल विषय न निवडता पुढे उपयुक्त ठरतील असेच विषय आम्हाला ते निवडण्यास सांगत. त्यांची विषय सोपा करून सांगण्याची हातोटी मोठी विलक्षण होती. प्रो.अय्यांकडून शिकलेल्या अशा अनेक खुब्यांचा मला नंतर खूपच उपयोग झाला.
मी कॉलेजात शेवटच्या वर्षाला शिकत असताना, नेदरलॅंडमधील फिलिप्स कंपनीने एक स्कॉलरशिप देउ केली होती. या स्कॉलरशिपसाठी मी अर्ज केला होता. त्याचाच परिणाम म्हणून काही दिवसांनी एका बड्या हॉटेलमधे असलेल्या मुलाखतीसाठी मला बोलावणे आले. मुलाखत उत्कृष्ट झाली होती. फिलिप्स कंपनीमधील ज्या बड्या अधिकार्‍याने माझी मुलाखत घेतली होती त्या अधिकार्‍याच्या व्यक्तिमत्वाची तर माझ्यावर खूपच छाप पडली होती. ती स्कॉलरशिप अखेरीस मला काही मिळाली नाही व ती मुलाखत मी नंतर विसरूनसुद्धा गेलो होतो. पदवीधर झाल्यावर मी नोकरीच्या शोधात होतो. एका अत्यंत बड्या उद्योगसमुहाचे एक वरिष्ठ अधिकारी आमच्या परिचयाचे होते. त्यांना मी भेटलो व त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर माझा अर्ज पाठवून दिला होता. काही दिवसांनी मला मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुंबईच्या फोर्ट भागातल्या एका टोलेजंग इमारतीतील एका वातानुकुलीत खोलीत माझी मुलाखत झाली. मी त्या खोलीत भीतभीतच शिरलो होतो. समोर सात आठ सुटाबुटातले वरिष्ठ अधिकारी होते. मी डावीकडे नजर टाकली आणि आश्चर्य म्हणजे फिलिप्स कंपनीतील ज्या अधिकार्‍याने माझी मुलाखत घेतली होती तोच तिथे बसला होता. मला एकदम बळ आले. माझी मुलाखत छानच झाली व मला ती नोकरी मिळाली. या अधिकार्‍याचे नाव होते के.पी.पी. नंबियार आणि पुढची काही वर्षे त्यांच्या हाताखालीच काम करण्याची संधी मला मिळाली.अतिशय धडाकेबाज रित्या, के.पी.पी. कोणतीही अडचण सोडवत असत. कोणत्याही नवीन प्रकल्पाचा आराखडा करणे, लागणार्‍या सर्व गोष्टींची जुळणी करणे हे काम अत्यंत तडफदारपणे ते करत. हे गृहस्थ पुढे केलट्रॉन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले व त्या नंतर भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे ते सचीव होते.
माझे जिगसॉ पझल आता खरे म्हणजे खूपच भरत आले आहे. अनेक व्यक्ती आणि प्रसंगाच्या चित्रांनी ते भरून गेले आहे तरी आणखी एक चित्र मला दिसते आहे तात्या फाटकांचे. फाटकी शरीरयष्टी, अंगात स्वच्छ पांढरा बुशकोट घातलेले तात्या अतिशय सौहार्द्रपूर्ण स्वभावाचे होते. पुण्यातून पौडकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या वनाझ इंजिनीयर्स या कंपनीचे तात्या एक संस्थापक. एल.पी.जी. गॅस सिलिंडर्सना जो एक रेग्युलेटर लागतो त्याचे भारतात प्रथम उत्पादन यांनीच चालू केले होते. त्या वेळी मी एक नवीन उपकरण विकसित केले होते. तात्या असेच मला एकदा भेटले. सध्या काय चालले आहे अशी पृच्छा त्यांनी केली. नवीन विकसित केलेल्या उपकरणांबद्दल मी त्यांना माहिती दिली. त्यावर बाकी फारशी चौकशी न करता उद्या ऑफिसमधून ऑर्डर घेऊन जा एवढेच ते म्हणाले. नवीन विकसित उत्पादनाला पहिली ऑर्डर मिळविणे अतिशय कठिण असते. त्यामुळे नवीन उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची तात्यांची ही पध्द्त मला फारच आवडली आणि पुढे जेंव्हा जेंव्हा शक्य झाले तेंव्हा इतरांना अशीच मदत करण्याचा मी प्रयत्न केला.
मला अशीच मदत करणारे, भाऊ जोशी यांचे चित्र तर अतिशय स्पष्ट आहे. धंद्यात भाऊ खरे म्हणजे माझे प्रतिस्पर्धी. पण मला कसलीही अडचण आली की मी भाऊंकडे धाव घेत असे. मशिनरी खरेदी, कच्च्या मालाच्या अडचणी, कामे करून घेण्याचे ठेकेदार, भाऊंनी मला नेहमीच मदत केली. उत्पादनाच्या रूक्ष धंद्यात असलेल्या या गृहस्थाला खरा रस होता छोट्या खेळातल्या आगगाड्या जमविण्याचा. पुढे जेंव्हा शक्य झाले तेंव्हा त्यांनी आपल्या कारखान्याच्या गच्चीवर, या आगगाड्यांचे एक संग्रहालयच उभारले. आजमितीलाही ते चालू आहे आणि खूप लोकप्रिय आहे.
मी आहे तोपर्यंत माझे हे जिगसॉ पझल मी लावतच रहाणार आहे. ते खूप भरले असले तरी आणखी किती तुकडे लावायचे आहेत? आणखी किती चित्रे तयार होणार आहेत? हे मला किंवा कोणालाच माहिती नाहीये. पण सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे मी शेवटचा तुकडा बसवला की माझ्याबरोबरच हे जिगसॉ पझल पण अदृष्यांत विरणार आहे, परत कोणालाच कधीच न दिसतां

2 comments:

  1. आपल्या सबंध आयुष्याला जिगसॉ पझल असा सुंदर शब्द तुम्ही सुचवला आहे. मला आठवते, की या पूर्वी हाच शब्द वापरून श्री. रामदास भटकळ यांनी सुरेख असे आत्मचरित्र लिहिले आहे. त्या सर्व लेखांच्या संग्रहाला त्यांनी हेच नाव दिले आहे, असे मला स्मरते.
    आणखी एक शंका. अशी जिगसॉ पझल मी सुद्धा अमेरिकेत तयार केलेली पाहिली. आपल्याकडे कुणी बनवत नाही काय ?
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  2. mannab
    आयुष्यात काही काळ संबंध आलेल्या व्यक्तींबद्दल मला लिहायचे होते. जिगसॉ पझल लावताना एखादा तुकडा बरोबर जागेपर्यंत लागेपर्यंत आपल्याला अतिशय महत्वाचा वाटतो नंतर तो लक्षात पण रहात नाही. यावरून मला हे नाव सुचले. आपल्याकडे ही पझल्स आता मिळतात मात्र ती कोठे बनवलेली असतात हे मला माहिती नाही. बहुतेक चीन मध्ये बनवलेली असतील.

    ReplyDelete