Wednesday, January 11, 2012

Helicopter aided Power lines repairs

New year has brought conditions of extreme cold for entire northern region of India. Kashmir also has been no exception. The temperatures at many places in the valley,  have gone below zero degree Celsius and there has been a very heavy snow fall in the valley and surrounding areas. The Kashmir valley is situated amongst the Pir-Panjal mountain ranges. These mountain ranges also have received very heavy snow fall, which has affected the communications between Kashmir and rest of the country. In the vicinity of famous Jawahar Tunnel, the road between Jammu and Srinagar via Pathankot, also has received very heavy snow fall, as this road passes here through very rough hilly and mountain region.नवीन वर्ष येताना संपूर्ण उत्तर भारतासाठी कमालीची थंडी घेऊन आले आहे. कश्मिर सुद्धा याला अपवाद नाहीच. कश्मिरमध्ये अनेक ठिकाणी तपमान शून्याखाली गेले आहे व हिम वर्षाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पिर पंजाल पर्वतरांगांच्या मध्ये, कश्मिर खोरे वसलेले असल्याने या चारी बाजूंना असलेल्या पर्वत रांगांवर अर्थातच मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला आहे व त्यामुळे कश्मिर व इतर देश यांच्या मधील दळणवळणावर स्वाभाविकच प्रभाव पडला आहे. जम्मूहून पठाणकोट मार्गे श्रीनगरला जाणार्‍या रस्त्यावर, जवाहर टनेल हा प्रसिद्ध बोगदा आहे. हा रस्ता अतिशय डोंगराळ अशा भागातून जातो. मागच्या आठवड्यात या भागातही तुफान हिमवृष्टी झाली.  
या हिमवृष्टीने कश्मिर खोर्‍याला ज्या विद्युत वाहिन्यांतून वीज पुरवठा होतो त्या विद्युत वाहिन्या दोन किंवा तीन ठिकाणी खंडित झाल्या व संपूर्ण कश्मिर खोर्‍याचा वीज पुरवठाच शुक्रवार दिनांक 6 जानेवारी पासून बंद पडला. अशा जीवघेण्या थंडीत, वीज चालू नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रामबन व मकरकोट या दोन गांवांजवळ या विद्युत वाहिन्यांमधे बिघाड निर्माण झाला होता. हा सर्वच भाग 8000 ते 9000 फूट उंचीवर असून अतिशय डोंगराळ असल्याने दुर्गम आहे. अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा येथून जाणार्‍या वीज वाहिन्यांची देखभाल करणे अतिशय जिकिरीचे व कष्टाचे असते. एवढी हिमवृष्टी झालेली असताना या वीज वाहिन्या ज्या मनोर्‍यांवरून नेलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचणे सुद्धा अशक्य कोटीतले काम होते. या विद्युत वाहिन्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मालकीच्या असून किशनपूर ते वागूरा यांच्या दरम्यान टाकलेल्या आहेत.
या हवामानात दुरुस्ती आणि देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांना वीज वाहक तारांच्या मनोर्‍यापर्यंत पोचणे सुद्धा कठिण आहे हे पॉवर ग्रिड कंपनीच्या लोकांनी जम्मू-कश्मिर राज्य सरकारला सांगितल्यावर अखेरीचा उपाय म्हणून राज्य सरकारने वायू दलाला पाचारण करण्याचे ठरवले.
रामबन आणि बनिहाल या दोन गांवाच्या मध्ये असलेल्या वीजवाहक तारां जवळून, वायुदलाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यावर, असे आढळून आले की रामसू या खेडेगावाजवळ असलेल्या एका मनोर्‍यावरच्या तारा खराब झाल्या आहेत. हा मनोरा अशा ठिकाणी उभारलेला होता जेथे जवळ हेलिकॉप्टर सुद्धा उतरवता येईल अशी जागा नव्हती. वीज वाहिनी दुरुस्त करणार्‍या पथकाला मनोर्‍याच्या अगदी जवळ खाली उतरवणे आवश्यक होते कारण अगदी सर्वात जवळच्या रस्त्यावर जर त्यांना उतरवले असते तरी ते पथक मनोर्‍यापर्यंत पोचेपर्यंतच दिवस संपला असता.
या कारणांमुळे वायू दलाने या दुरुस्ती पथकाला अगदी मनोर्‍याजवळ क्रेनने उतरवायचे ठरवले. या मनोर्‍याजवळचा टापू अडथळ्यांनी भरलेला होता व सोसाट्याच्या वार्‍याने हेलिकॉप्टर्सना हवेत एका जागी स्थिर ठेवणे अतिशय कठिण व कौशल्याचे काम होते. जानेवारीच्या 8 तारखेला वायु दलाच्या उधमपूर बेस वरून, वायु दलाच्या एम आय 17 हेलिकॉप्टरने हे दुरुस्ती पथक व त्यांना आवश्यक असलेली 5 टन वजनाची यंत्रसामुग्री या रामसू खेड्याजवळ असलेल्या चंदरकोट हेलिपॅडवर उतरवली.  

चंदरकोट हेलिपॅड वरून हे पथक व सामान यांना चित्ता या हलक्या हेलिकॉप्टर्स मधून या मनोर्‍याजवळ नेण्यात आले. येथे या दुरुस्ती पथकाला मनोर्‍याच्या जवळ जमिनीपासून आठ किंवा नऊ फुटावर हेलिकॉप्टरमधून आणले गेले नंतर हेलिकॉप्टर स्थिर ठेवून क्रेनच्या सहाय्याने दुपारी 4-30 च्या सुमारास खाली उतरवले.
पुढच्या काही तासात पॉवर ग्रिड कंपनीच्या दुरुस्ती पथकाने बिघाड झालेल्या तारा दुरुस्त केल्या व हे पथक वायु दलाच्या मदतीने परत आले. वाहिन्यांची दुरुस्ती झाल्यावर दुसर्‍या दिवसापर्यंत (जानेवारी 9) कश्मिर खोर्‍यातील 98% वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
वायु दलाच्या मदतीमुळे हे कार्य सुकर झाले व सहजतेने पार पडले हे सर्व ठीक आहे. परंतु या डोंगराळ भागात वीज वाहिन्यांचे जाळे उभारून ते व्यवस्थित चालू ठेवण्याची जबाबदारी खांद्यावर असलेल्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन सारख्या सरकारी मालकीच्या संस्थेकडे अशा प्रकारच्या आपादस्थितीला तोंड देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा किंवा हेलिकॉप्टर्स नाहीत ही बाब मोठी लाजीरवाणी आणि गंभीर आहे असे मला वाटते. परदेशातील अशा प्रकारच्या कंपन्यांकडे स्वत:ची हेलिकॉप्टर्स असतात व ती वापरून नियमित देखभाल चालू असते. पॉवर ग्रिड कंपनीला अशा प्रकारच्या आपादस्थिती भविष्यातही येणार हे लक्षात घेऊन हेलिकॉप्टर्सचा अंतर्भाव असलेली कायम स्वरूपी देखभाल यंत्रणा नेहमी सज्ज ठेवण्याची गरज आहे असे मला वाटते. हिमवृष्टी, तारांवर बर्फ साठणे या गोष्टी दर वर्षी होणारच. तेंव्हा त्यांना तोंड देण्याची स्थायी यंत्रणा ही आवश्यकच आहे.
11 जानेवारी 2012

2 comments:

  1. True Team Work for Public Good.Surprisingly has not got Media Mileage.Power Grid will learn if they are Billed on Commercial Terms & not as a support from one Govt arm to another; only then will they become a responsible & reliable Service Provider

    ReplyDelete
    Replies
    1. VivekVichar
      Very true. No doubt, Air force did a commendable job. But why power grid does not have a maintenance arm is the real question.

      Delete