Wednesday, January 4, 2012

A Deccan Odyssey Part IV

Quantcast I have been asking a question to myself, ever since I saw the ruins of the Hampi King's palace yesterday. The King's palace and the bathing enclosure for the queen and her royal female entourage were all there. Yet there were no traces of any dwelling where the queen could have be resided. Why was it so and why there were no ruins of any place where queen and her female entourage lived? 
I find an answer to this question in my mind today. The queen's residence is actually at quite a distance from the King's palace and is known as 'Zenana Enclosure'. I am on my way now to visit this place now. Zenana enclosure is surrounded by a huge rampart all around. The parapet wall is very thick. At one place the wall has collapsed and I can see the construction and the thickness of this rampart in a sectional view. 

जनाना एनक्लोजरची मजबूत दगडी भिंत
हंपीच्या राज निवासाचे भग्न अवशेष काल बघितल्यापासून एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे. काल मी राज निवास बघितला, राण्यांचे जलक्रीडा केंद्र बघितले, परंतु राण्यांचे निवासस्थान वगैरे कोठेच दिसले नाही. याचे कारण आज मला समजते आहे. प्रत्यक्षात राण्यांचे निवासस्थान अगदी निराळ्याच ठिकाणी आहे व राज निवासापासून ते बर्‍याच अंतरावर आहे. हे निवासस्थान बघायलाच मी आता निघालो आहे. या निवासस्थानाला जनाना एनक्लोजर‘ (Zenana Enclosure) असे म्हटले जाते. राज निवासाप्रमाणेच या परिसराभोवतीही भक्कम तटबंदी आहे. एका ठिकाणी हा तट तुटलेला असल्याने ही भिंत किती भरभक्कम बांधलेली होती याची चांगलीच कल्पना येते आहे
या जनानखान्यात एकदा एखादी स्त्री गेली की तिला परत बाहेरची हवा लागणे शक्यच नव्हते. या बद्दलची एक मोठी रोचक गोष्ट मी वाचली आहे. ‘ विजयनगरचे शत्रू असलेल्या बहमनी राज्यातल्या मुदगल या गावातल्या एका सोनाराला प्रयाल नावाची एक कन्या होती. ही मुलगी अत्यंत सुंदर असून संभाषण, संगीत व इतर कलांमध्ये ती अतिशय प्रवीण होती. तिची ख्याती विजयनगरचा राजा पहिला देवराय याच्या कानापर्यंत पोचली. राजाने एका ब्राम्हणाला काहीही थापाथापी करून तिला विजयनगरला घेऊन येण्याची आज्ञा केली व गळ्याभोवती घट्ट बसणारा एक अलंकार तिच्यासाठी पाठवला. परंतु विजयनगरला जाणे म्हणजे तुरूंगात जाण्यासारखे आहे व परत आई-वडीलांची भेट होणार नाही हे त्या चतुर मुलीने जाणले व जाण्यास नकार दिला. यामुळे क्रुद्ध झालेल्या देवरायाने 30000 सैनिकांसह मुदगलकडे कूच केले. ही बातमी समजताच ही मुलगी आपल्या आई-वडीलांबरोबर जंगलात पळून गेली. विजयनगरच्या सैन्याने या भागात येऊन प्रचंड नासधूस केली व रिकाम्या हाताने ते परत गेले. या आक्रमणाची बातमी बहमनी सुलतानाला जेंव्हा कळली तेंव्हा तो प्रचंड सैन्य घेऊन विजयनगरवर चालून आला. देवरायाने त्याच्याशी तह करून त्याला 10 लक्ष होन, 5 मण मोती,50 हत्ती, 2000 स्त्री, पुरुष गुलाम सुलतानाला दिले व आपल्या मुलीचे सुलतानाशी लग्न करून दिले.
विजयनगरचा जनानखाना बघताना ही गोष्ट मला वारंवार आठवते आहे. हा जनानखाना, त्यात राहणार्‍या स्त्रियांना एखाद्या सोन्याच्या पिंजर्‍याप्रमाणे वाटत असणार यात शंकाच नाही. बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत गेले की एक मोठे विस्तृत आवार दिसते आहे. साधारण मध्यभागी अंदाजे 150 फूट लांब व 90 फूट रूद असे राणी महालाचे जोते दिसते आहे. हे जोते तीन स्तरांवर आहे व प्रत्येक स्तरावर महानवमी डिब्बाया राजनिवासातील चौथर्‍यासारखेच पण अतिशय नाजूक डिझाइनचे असे नक्षीकाम केलेले आहे. या जोत्यावर, चंदनी लाकूड वापरून बांधलेला महाल होता असे म्हटले जाते. या महालाच्या समोर एका उथळ अशा तलावाच्या( सध्या कोरडा) मध्यभागी बांधलेला व नाजूक नक्षीकाम केलेला एक चौथरा दिसतो आहे. या चौथर्‍यावर जलमहाल ही इमारत होती. पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी असल्याने, उन्हाळ्याच्या दिवसात ही इमारत थंड रहात असे. जनानखान्याच्या वापरासाठी एक मोठा तलावही याच आवारात दिसतो. त्याशिवाय एकही खिडकी नसलेली एक इमारत दिसते आहे. ही इमारत धनदौलत, दागदागिने, ठेवण्यासाठी वापरली जात होती. या धनकोषाच्या इमारतीशिवाय, या परिसरात अजुनही उभी असलेली एकमेव इमारत म्हणजे कमल महाल(Lotus Palace) किंवा चित्रांगणी महाल. विटांचे बांधकाम व त्यावर चुन्याचे प्लॅस्टर अशी बांधणी असलेली ही दुमजली इमारत, काय कारणासाठी वापरली जात होती? हे सांगणे कठिण आहे. परंतु सर्वसामान्य समजुतीप्रमाणे राज घराण्यातील स्त्रिया या महालात भेटत असत किंवा स्त्रियांचे कार्यक्रम येथे होत असत. या इमारतीचा एकूण आकार हा अर्धविकसित कमल पुष्पासारखा आहे असे म्हटले जाते. त्यामुळे याला कमल महाल बहुदा म्हणत असावेत. त्याच प्रमाणे आतल्या घुमटावर कमळाच्या कळ्यांचे डिझाइन आहे.इमारतीच्या चारी बाजूंना मोठमोठ्या कमानी आहेत व त्यावर पडदे सोडण्याची सोय केलेली दिसते आहे. वरच्या मजल्यावर सर्व बाजूंना बाल्कनी दिसत आहेता. या कमानींवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही बांधकाम पद्धतींचा या इमारतीत मिलाफ झालेला दिसतो आहे. कमानी इस्लामिक पद्धतीच्या आहेत. कदाचित या मुळेच ही इमारत वाचली आक्रमकांच्या हल्ल्यातून वाचली असावी.
दुमजली कमल महाल
कमल महालाच्या क्मानी व त्यावरील कोरीव काम Stunningly beautiful
जनाना एनक्लोजरचा गार्ड टॉवर, यात स्त्री किंवा तृतिय पंथी सैनिक पहारा देत असत.
नागदेवतेचे शिल्प
जनानखान्याच्या साधारण इशान्येला हत्तींचे तबेले आहेत. राण्यांच्या उपयोगासाठी विजयनगरच्या 500 हत्तींपैकी 12 हती ठेवलेले असत. हे हत्ती या तबेल्यात बांधलेले असत. हत्तीच्या पायांना साखळदंडांनी न बांधता वर छतात बसवलेल्या एका हूक मधे साखळी अडकवून ती हत्तीच्या छातीभोवती अडकवलेली असे. या हत्तीचे माहूत व इतर कर्मचारी यांच्यासाठी बांधलेली इमारत जवळच आहे. या इमारतीचे जोते एवढे उंच आहे की हत्तीवर बसण्यासाठी याचा उपयोग केला जात असे.
हत्ती तबेला
जनाना एनक्लोजर मधून दिसणारा दूरवरचा एक एकाकी गार्ड टॉवर
जनानखान्याचा फेरफटका संपवून मी आता परत एकदा उत्तरेच्या दिशेने निघालो आहे. हंपीमधल्या भग्न अवशेषांमधले सर्वोत्कृष्ट म्हणून जे गणले जाते त्या विठ्ठल मंदिराकडे माझी बस निघाली आहे. बस स्थानक या मंदिरापासून बरेच दूर आहे. आता मोठी पायपीट करावी लागणार असे मनात येत असतानाच एक मोठी छानदार व बॅटरीवर चालणारी मिनीबस नजरेसमोर येते. बस व वाहने यांच्या डिझेल व पेट्रोल धुरामुळे या मंदिराच्या अवशेषांवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून ही बस तुम्हाला विठ्ठल मंदिर परिसरापर्यंत घेऊन जाते. मिनीबस प्रथम एका मोठ्या दगडी फ्रेमपाशी उभी राहते. ही फ्रेम म्हणजे राजाची तुला करण्यासाठी उभारलेला एक दगडी सांगाडा आहे. यावर एक तराजू बांधून राजा एका पारड्यात बसत असे व दुसर्‍या पारड्यात धन संपत्ती टाकून दोन्ही पारडी एका रेषेत आली की ती धन संपत्ती गोरगरिबांना दान केली जात असे.
विठ्ठल मंदिरात जाण्यासाठीची बॅटरीवर चालणारी मिनीबस
राज तुला
विठ्ठल मंदिरापाशी थांबण्याआधी आमची मिनी बस मला तुंगभद्रा नदीच्या काठाशी घेऊन जाते. या ठिकाणापासून नदीचे पात्र खरोखरच अतिशय नयनमनोहर दिसते आहे. निळेशार आकाश, त्याच्या खाली दगडधोंड्यांनी आच्छादित टेकड्या व समोर आकाशासारखीच निळीशार तुंगभद्रा नदी हा सर्व देखावा नयनांचे पारणे फेडणारा वाटतो आहे. नदीच्या काठालगत पुरंदरदास या महान कवीचा आश्रम होता. त्याचे अवशेष फक्त आता दिसत आहेत. नदी ओलांडण्यासाठी येथे मोठ्या विणलेल्या गोल आकाराच्या टोपल्या वापरल्या जातात. वेळेअभावी त्यांच्यातून सफर करण्याची माझी इच्छा काही फलद्रूप होऊ शकत नाहीये. नदीच्या पात्राच्या समोर असलेल्या टेकडीचे नाव अंजनेय टेकडी असे आहे. त्यावर अंजनेय किंवा मारुतीचे पांढरे शुभ्र मंदिर उन्हात नुसते चमकते आहे.
तुंगभद्रा नदीचे पात्र, मागे अंजनेय टेकडी
फुल झूम करून काढलेले अंजनेय टेकडीवरच्या अंजनेय मंदिराचे छायाचित्र
या परिसरात असलेल्या व दगडधोंड्यांनी वेष्टित असलेल्या सर्वच टेकड्यांना मोठी काव्यात्मक नावे आहेत. गंधमादन, मातंग, हेमकूट, मलयवंत आणि ऋषिमुख अशी नावे वाचल्यावर मला कालिदासाच्या किंवा भवभूतीच्या कालात आपण गेलो आहोत असे वाटू लागले आहे.
विठ्ठल मंदिराच्या गोपुरावरची अप्रतिम शिल्पकला
विठ्ठल मंदिराचा परिसर (कोर्ट यार्ड)
आता मिनीबस विठ्ठल मंदिराकडे निघाली आहे. मंदिराच्या बाहेर बस थांबते व मी उतरतो व गोपुराच्या दिशेने चालू लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वारातून मागे वळून बघितल्यावर हंपी बाजार किंवा कृष्ण बाजार सारखी दुकाने येथे दिसत आहेत. दुकाने आणि मध्यभागचा रस्ता यामधे पाणी साठवण्यासाठी लांबलचक अशी कुंडे आहेत. या ठिकाणी विजयनगरचा गुरे बाजार भरत असे. अरबी घोडे, बैल, गायी वगैरे प्राणी या ठिकाणी दूर दूर ठिकाणांवरून विक्रीसाठी येत असत. मी परत मंदिराकडे वळतो. गोपुराची बरीच पडझड झालेली दिसते आहे परंतु शिल्लक भागावर अजुनही अप्रतिम शिल्पकाम दिसते आहे. प्रवेशद्वार ओलांडून मी मंदिर परिसरात प्रवेश करतो. एक अतिशय भव्य आणि मनात ठसणारे दृश्य नजरेसमोर उलगडत आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी समोर, एका रेषेत, ध्वजपीठ, ज्योतीपीठ व बलिपीठ अशी नावे असलेले चौथरे उभे आहेत. या चौथर्‍यांच्या मागे एक मोठे तुळशी वृंदावन दिसते आहे व त्याच्या मागे हंपीचा जगप्रसिद्ध पाषाण रथ दिसतो आहे. या पाषाण रथाच्या मागे मंदिराचा महामंडप दिसतो आहे. महा मंडपाच्या दोन्ही अंगांना नक्षीदार खांबांचा वापर केलेले चार उघडे मंडप आहेत. महामंडपाच्या उजव्या हाताला पाकगृह मंडप व त्याच्या मागे भजनगृह मंडप दिसतो आहे तर महामंडपाच्या डाव्या हाताला लग्नविधीसाठी उभारलेला कल्याणमंडप आहे. या कल्याण मंडपाच्या पुढे कृष्णदेवराय या राजाने बांधलेला नृत्यमंडप आहे. या मंडपात कृष्णदेवरायची धाकटी राणी चिन्नादेवी ही नृत्य करत असे. हे नृत्य राजा व राजघराण्यातील इतर काही थोडे लोकच बघू शकत असत. त्यामुळे या मंडपाला चारी बाजूंनी पडदे लावण्याची सोय आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की ही राणी दसर्‍याच्या दिवशी कृष्ण मंदिर, विरूपाक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर या तिन्ही ठिकाणी नृत्य करत असे.
तुळशी वृंदावन
परंतु यासम हा, पाषाण रथ
मी आता मंदिर परिसरात शिरलो आहे. नजरेसमोर प्रथम येतो आहे पाषाण रथ. प्रत्यक्षात हा रथ म्हणजे अनेक दगडी भाग वापरून बनवलेले एक शिल्प आहे मात्र या भागांमधले सांधे इतक्या बेमालूमपणे लपविलेले आहेत की हा रथ एका दगडातून कोरून काढला आहे असे वाटते. . हा रथ म्हणजे गरूडाचे मंदिर होते व म्हणून तो विठ्ठलाच्या समोर स्थापन केलेला आहे. रथाच्या तीन बाजूंना पुराणात वर्णन केलेल्या लढायांची चित्रे व इतर नक्षीकाम वापरून अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. चौथ्या बाजूला प्रवेशद्वार व आत शिरण्यासाठी बनवलेली दगडी शिडी आहे. रथाची सर्व चाके दगडी आसावर बसवलेली आहेत व ती पूर्वी फिरू शकत होती. या चाकावर फुलांच्या आकाराची नक्षी दिसते आहे. रथाच्या खालच्या भागावर मूळ रंगकाम अजून दिसतेआहे. हा रथ व मंदिर पूर्वी संपूर्णपणे रंगवलेले असे. हा रथ ओढण्यासाठी मुळात दोन घोड्यांची शिल्पे दाखवलेली होती. ती नष्ट झाल्याने तेथे दोन हत्तींची शिल्पे ठेवलेली दिसतात. मात्र मूळ घोड्यांच्या शिल्पातले पाय व शेपट्या अजून दिसत आहेत.
महामंडपातील दक्षिण कक्ष
नाद निर्मिती करणारे स्तंभ
नृत्य कक्षातील एक स्तंभ
मंदिराचा महामंडप हा चार कक्षांचा मिळून बनलेला आहे. समोरच्या बाजूने प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती शिल्पे आहेत तर पूर्व , पश्चिम बाजूंच्या पायर्‍यांजवळ यालिसया काल्पनिक सिंहाची शिल्पे आहेत. महामंडपाच्या सर्व बाजूंनी अतिशय सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. यात अगदी खालच्या बाजूला असलेली अश्व व त्यांचे अश्वशिक्षक यांची शिल्पे तर अप्रतिमच म्हणता येतील. महामंडपाच्या सर्व कक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कक्षांमधील अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत. प्रवेश द्वाराजवळ दोन्ही बाजूंना जे स्तंभ आहेत त्यांच्यावर आघात केला तर सा रे ग म असे स्वर निघतात. त्याच प्रमाणे निरनिराळ्या स्तंभांच्यावर निरनिराळ्या वाद्यांमधून निघणारे सूर निघतात असे सांगितले जाते. मंदिराचे मोडतोड होऊ नये म्हणून या स्तंभांच्यावर आघात करण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे. पूर्वेकडच्या कक्षाला संगीत कक्ष असे नाव आहे. या कक्षाच्या बाजूंना वादक आणि वाद्ये यांचीच शिल्पे आहेत. दक्षिणेकडच्या कक्षात यालिससिहाचीच शिल्पे आहेत तर उत्तरेकडच्या कक्षात नृसिंहाबद्दलची शिल्पे आहेत. पश्चिमेचा कक्ष इस्लामिक आक्रमकांच्या हल्ल्यात बहुदा नष्ट झाला असावा. याच्या पुढे गाभारा आहे. गाभार्‍यातल्या मूर्ती नष्ट झालेल्या आहेत. गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस कमल पुष्पाची अनेक सुंदर शिल्पे दिसतात.
प्रवेश पायर्‍यांच्या बाजूचे ‘यालिस’ या काल्पनिक सिंहाचे शिल्प
मंदिराच्या जोत्यावर असलेले अश्व व अश्वशिक्षक यांच्या शिल्पांचे पॅनेल
विठ्ठल मंदिराचा रिक्त गाभारा
विठ्ठल मंदिराबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इथल्या मूर्तीच पंढरपूरला नेल्या आहेत वगैरे. खरे खोटे विठोबाच जाणे. विठ्ठल मंदिराला भेट देताना ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी माझ्या ओठावर सारखी येते आहे. त्या ओवीमधल्या एका ओळीत शब्द आहेत. “कानडा वो विठ्ठलु, कर्नाटकुया ओवीवरून काही मंडळी विठ्ठल कर्नाटकातून आला असला पाहिजे असा अर्थ काढतात. मात्र या ओवीचा खरा अर्थ काही निराळाच आहे. कानडा हा शब्द अगम्य, अनाकलनीय या अर्थाने व कर्नाटकु हा शब्द नाटक्या, लाघवी या अर्थाने वापरला आहे असे अनेक तज्ञांनी सांगितलेले आहे. तरीही कर्नाटकातल्या या मंदिरात गेल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्याही अर्थाने ही ओवी लिहिली असली तरी विठ्ठल आणि कर्नाट्क यांचे खास नाते आहे हे मनाला सारखे जाणवते आहे. विठ्ठल मंदिर बघितल्यावर माझा हंपीचा फेरफटका पूर्ण झाल्यासारखा वाटतो आहे. हे मंदिर खरोखरच अद्वितिय आहे यात शंकाच नाही.
मंदिराच्या पूर्व प्रवेश पायर्‍यांजवळील स्तंभांवरचे  एक शिल्प
विठ्ठल मंदिराजवळचा फुललेला फ्रॅन्जिपनी वृक्ष


विजयनगरचा रामराजा व बहमनी साम्राज्याच्या उत्तराधिकारी असलेल्या निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, व इमादशाही या चारी राज्यांच्या संयुक्त सेना, यांच्यामधे बनीहट्टी येथे 23 जानेवारी 1564 रोजी शेवटची लढाई झाली. विजापूरची प्रसिद्ध मलिक--मैदान तोफ फक्त एकदाच म्हणजे या लढाईत वापरली गेली. या लढाईत रामराजा मारला गेला व विजयनगरच्या सेनेचा संपूर्ण पराभव होऊन विजयनगरचे साम्राज्य बुडाले. यानंतर 6 महिने शत्रू सैनिकांनी विजयनगरचा विध्वंस करून या सुंदर राजधानीचे भग्न अवशेषात रूपांतर केले. मात्र विजय नगरचे साम्राज्य बुडाले असले तरी या साम्राज्याने दख्खन व दक्षिण भारत यांचे इस्लामीकरण होण्याची प्रक्रिया थांबवली ती थांबलीच. या कालानंतर थोड्या दशकांनीच दख्खनमधे एका नव्या शक्तीचा उगम झाला. ती शक्ती होती शहाजी महाराज भोंसले. बरीदशाही, इमादशाही व निजामशाही हळूहळू नष्ट झाल्या व दख्खनचे पुढचे राजकारण आदिलशाही व भोंसले कुल याभोवतीच फिरत राहिले.
दख्खनच्या भटकंतीमधे आता मला जायचे आहे विजयनगरच्या कालाच्या हजार वर्षे मागे. या कालात येथे राज्य करत असलेल्या चालुक्य राजघराण्याच्या खाणाखुणा शोधायला.
10 फेब्रुवारी 2011

No comments:

Post a Comment