Friday, January 6, 2012

A Deccan Odessey Part VI

The capital of the empire, established at Aihole, in present day Bagalkot district of the state of Karntaka, by the Chalukya kings, who maintained their complete hold over the Deccan plateau from Sixth to Eighth century AD, was shifted later to Vatapi (present day Badami, again in Bagalkot district). A village called Pattadakal, situated at a distance of About 28 KM from Badami, was a place of extreme importance for the Chalukya kings. Really speaking,  this village is also just an ordinary village like Aihole. Even then,  Chalukya kings had constructed, over the years, some of the most magnificent temples, at this place. A geographical reason is put forward by many, for the selection of this place,  instead of state capital Badami, to construct the temples. This village is located on the banks of Malaprabha river, which is a subsidiary of the giant Krishna river. This Malaprabha river flows, like most of the rivers in south India, from the west coast towards east coast. Near about this village of Pattadakal, Malaprabha river changes its course for a short distance and flows northwards for few miles. This was considered very auspicious by the Chalukya kings and was the reason for construction of the temples here. For Chalukya kings this place was so auspicious that even coronation of Chalukya kings was done at Pattadakal and not at state capital Badami.  
इसवी सनानंतरच्या सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत, दख्खनच्या पठारावर आपली सत्ता अबाधित राखणार्‍या चालुक्य राजवंशातील राजांनी, प्रथम आपली राजधानी ऐहोले येथे स्थापन केली असली तरी नंतर त्यांनी ती कर्नाटक राज्यामधल्या बागलकोट जिल्ह्यात असलेल्या बदामी या गावात हलवली होती. या बदामी पासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या पट्टडकलहे खेडेगाव या राजांच्या दृष्टीने एक महत्वाचे स्थान होते. तसे पहायला गेले तर ऐहोले प्रमाणेच पट्टडकल सुद्धा एक अतिशय सर्वसामान्य असेच खेडेगाव आहे. परंतु या गावाजवळ चालुक्य राजांनी अनेक सुंदर मंदिरे या कालात बांधली. ही मंदिरे बांधण्यासाठी बदामी या राजधानीची निवड न करता हे गाव त्यांनी का निवडले याचे एक कारण या गावाचे भौगोलिक स्थान हे दिले जाते. या गावाजवळून मलप्रभा ही कृष्णा नदीची एक उपनदी वाहते. दख्खनमधल्या किंवा दक्षिण भारतातल्या बहुसंख्य नद्या पश्चिकेकडून पूर्वेकडे वहातात. मलप्रभा ही नदी सुद्धा याला अपवाद नाही. मात्र पट्टडकल गावाजवळ ही नदी एकदम नव्वद अंशात वळते व काही अंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे वहाते. पट्टडकलची मंदिरे या दक्षिण-उत्तर प्रवाहाच्या अगदी काठालगत बांधलेली आहेत. चालुक्य काळात हे स्थान अतिशय पवित्र असे मानले जात होते व चालुक्य राजे आपला राज्याभिषेक राजधानी बदामी मधे न करवून घेता पट्टडकल मंदिरांच्यात करवून घेत असत.
ऐहोले वरून मी आता पट्टडकल कडे निघालो आहे. हा रस्ताही फारसा सुखावह नाही. अरूंद व खड्यांनी भरलेला रस्ता, आजूबाजूला उसाची शेती असल्याने उसांनी भरलेले मोठमोठे ट्रॅक्टर-ट्रेलर, गाई-म्हशी व धूळ व या सगळ्यात भर म्हणून कडकडीत ऊन, हे सगळे सहन करत येथे प्रवासी येत रहातात याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे बावनकशी सोन्यासारखी असलेली पट्टडकलची मंदिरे. या मंदिरांच्या स्थापत्याची जर ऐहोले व बदामीच्या स्थापत्याशी तुलना केली तर विनोदाने असे म्हटले जाते की जर ऐहोले मंदिरांना प्राथमिक शाळेतल्या मुलांचे हस्तकौशल्य मानले तर बदामी येथील मंदिरे ही माध्यमिक शाळेतील मुलांचे हस्तकौशल्य ठरतील व पट्टडकल मंदिरे ही कॉलेजात शिकणार्‍या मुलांचे हस्तकौशल्य मानावे लागेल. पट्टडकल गावाजवळ एका मोठ्या परिसरात आठ मंदिरांचा हा समूह आहे.


माझी बस पट्टडकल मंदिरांच्या परिसराजवळ थांबते. हा सर्व परिसर तारेच्या संरक्षक जाळीने सुरक्षित केलेला आहे व आत प्रवेश करण्यासाठी प्रवेशमूल्य द्यावे लागते. आत शिरल्यावर मला प्रथम दिसत आहेत मोठमोठी व हिरवीगार राखलेली हिरवळीची कुरणे. या कुरणांच्या पलीकडे पट्टडकलची मंदिरे मोठ्या दिमाखाने उभी आहेत.
कडासिद्धेश्वर मंदिर

पट्टकडलची मंदिरे सातव्या आणि आठव्या शतकात बांधली गेलेली असल्याने एकूणच आराखडा व कारागिरी ऐहोले पेक्षा जास्त सरस आहे हे प्रथम दर्शनीच जाणवते आहे. मी उत्तरेला असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतो व समोर असलेली हिरवळ ओलांडल्यावर पहिल्यांदा छोटेखानी आकाराची दोन मंदिरे समोर दिसत आहेत. ही मंदिरे आहेत कडासिद्धेश्वर व जाम्बुलिंग मंदिरे. दोन्ही मंदिरांची धाटणी अगदी साधी व साधारण सारखीच आहे. कडासिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेच्या भिंतीवर दोन द्वारपाल मूर्ती कोरलेल्या आहेत तर जाम्बुलिंग मंदिराची पूर्वेकडची भिंत कोरी आहे. दोन्ही मंदिरांच्या वरचे कळस उत्तर भारतीय म्हणजे रेखा-नगर प्रकारचे आहेत.
गलगनाथ मंदिर
गलगनाथ मंदिराचा उत्तर हिंदुस्थानी धाटणीचा रेखा-नगर कळस
गलगनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरचा नृत्य करणारा शिव
संगमेश्वर मंदिर
पट्टडकल मंदिरे बांधणार्‍या स्थापत्यविशारदांना नवीन नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा होती. त्यामुळे इथे असलेल्या मंदिरांच्या कळसांचे स्थापत्य उत्तर हिंदुस्तानी किंवा दाक्षिणात्य अशा दोन्ही धाटणींचे दिसते. कडासिद्धेश्वर व जाम्बुलिंग मंदिरांचे कळस हे रेखा-नगर प्रकारचे असले तरी कळसाच्या दर्शनी बाजूच्या मध्यभागी एक कोरलेले शिल्पही दिसते. मी थोडा पुढे जातो पुढे दिसणारे मंदिर म्हणजे गलगनाथ मंदिर आहे. या मंदिराचा कळस जरी आधीच्या दोन मंदिरांसारखाच असला तरी या मंदिराला दोन्ही बाजूंना पंखांप्रमाणे जोडलेले दोन व्हरांडे आहेत. या व्हरांड्यांवर उतरती दगडी छते आहेत. प्रवेशद्वारावरच्या लिंटेलवर, नृत्य करणारा शंकर, पार्वती व नंदी यांचे शिल्प आहे. या नंतर मी बघतो आहे. संगमेश्वर मंदिर. 2009 साली मलप्रभा नदीला मोठा पूर आला होता व पट्टकडल गाव पाण्याखाली बुडले होते. बर्‍याच गावकर्‍यांनी त्या वेळेस या संगमेश्वर मंदिराच्या छतावर आश्रय घेतला होता. हे मंदिर खूपच प्रशस्त आहे व बांधकाम अतिशय मजबूत दिसते आहे. मात्र मंदिरावर कलाकुसर फारच थोडी दिसते आहे.
डावीकडे मल्लिकार्जुन, उजवीकडे विरूपाक्ष व मध्यभागी काशी विश्वेश्वर मंदिरे
विरूपाक्ष मंदिरातून दिसणारा मलप्रभा नदीचा देखावा
विरूपाक्ष मंदिरासमोरचा नंदी
विरूपाक्ष मंदिर रंग मंडप, खांबांच्या वरचे बास रिलिफ उठून दिसत आहेत.
सात घोड्यांच्या रथावर आरूढ सूर्य नारायणाचे छतावर असलेले अप्रतिम भित्ती शिल्प
विरूपाक्ष मंदिराच्या बाह्य भिंतीवरचा विष्णू
थोडे आणखी पुढे गेल्यावर माझ्या नजरेसमोर येते आहे पट्टकडलचे सर्वात मोठे व प्रसिद्ध असलेले विरूपाक्ष मंदिर. दुसरा विक्रमादित्य या चालुक्य राजाची मोठी राणी लोकमहादेवी हिने हे मंदिर, कांची येथील युद्धात मोठा विजय विक्रमादित्य राजाला मिळाला म्हणून बांधले होते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हाय रिलिफ प्रकाराची शिल्पे आहेत. यात शंकर-उमा सारखी देवांची शिल्पे तर आहेतच पण या शिवाय युगुलांची चित्रे, योगासन करणारी एक व्यक्ती यासारखी अगदी निराळी शिल्पे पण आहेत. मंदिरासमोर काळ्या पाषाणाचा एक मोठा नंदी आहे. या नंदीच्या मागच्या बाजूस मलप्रभा नदीचा प्रवाह दिसतो. आहे. एकंदरीत हे मंदिर लक्षात राहण्यासारखे खासच आहे. मी मंदिरातील सभामंडपात जातो. वर छतावर 7 घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्यदेवांचे मोठे लक्षवेधक शिल्प आहे. मंडपाच्या खांबांवर छोटी किंवा मिनिअचर बास रिलिफ प्रकारची पॅनेल्स आहेत. रामायण, महाभारत आणि भागवत यातील गोष्टी या पॅनेल्सवर कोरल्या आहेत.
विरूपाक्ष मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिव मूर्ती
शंकर, उमा व व नंदी, विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंत
विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंतीवरील एक युगुल, पुरुष नाही म्हणत असल्याने स्त्री चिडलेली दिसते आहे.
विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंत, अचाट व्यायामप्रकार करणारी एक व्यक्ती
नंदी मंडपावरचे एक युगुल. स्त्री पुरुषाला सज्जड दम देताना दिसते आहे.
विरूपाक्ष मंदिर, महाभारताचे मिनिएचर बास रिलिफ
ब्रम्हा, महेश-उमा व विष्णू यांचे मिनिएचर बास रिलिफ
मल्लिकार्जुन मंदिर खांबावरील बास रिलिफ
समुद्र मंथन, मिनिएचर बास रिलिफ
पंचतंत्रातील लहान मुलाला वाचवणारे मुंगुस व त्यालाच मारणारी अविवेकी स्त्री
वृषभ व हत्ती यांचे एकच मस्तक असणारे गमतीदार शिल्प
या मंदिरातील युगुल चित्रे थोडी निराळी वाटत आहेत. काही प्रेमी युगुले दिसत असली तरी पुरुषाला चांगले खडसवत असलेली स्त्री किंवा पुरुषाबरोबर वाद घालत असलेली स्त्री, ही शिल्पेही इथे दिसत आहेत. या सर्व शिल्पांचे बारकाईने निरिक्षण करण्यासाठी पट्टकडल मंदिरांच्यात काही दिवस तरी घालवायला हवेत. माझ्याजवळ फारच कमी वेळ असल्याने मी पुढे निघतो आहे. या मंदिराच्या बाजूला आणखी एक शिव मंदिर आहे. विक्रमादित्य राजाची धाकटी राणी व लोकमहादेवी राणीची धाकटी बहीण, त्रैलोक्यमहादेवी हिने हे मंदिर बांधले होते. याचे नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिराचा एकूण आराखडा विरूपाक्ष मंदिरासारखाच असला तरी आतली बास रिलिफ्स मात्र पंचतंत्र आणि पुराणे यातल्या गोष्टींवर आधारित आहे. विरूपाक्ष आणि मल्लिकार्जुन या दोन्ही मंदिरांवरचे कळस हे दक्षिण भारतीय पद्धतीचे आहेत, त्यामुळे ही दोन मंदिरे एकदम निराळी उठून दिसत आहेत.
एक प्रेमी युगुल, पुरुष व स्त्री यांची केश रचना सारखीच दिसते आहे
प्रेमी युगुल, पुरुष व स्त्री या दोघांनी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकला आहे.
वादविवादाचा प्रसंग
1300 वर्षांपूर्वीची आधुनिक फॅशन, मिनिस्कर्ट व कुर्ता
काशी विश्वेश्वर मंदिर  
मल्लिकार्जुन मंदिराच्या मागच्या बाजूस काशी विश्वेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा कळस परत उत्तर हिंदुस्थानी किंवा रेखा-नगर प्रकारचा आहे. कळसावरचे डिझाइन मात्र अगदी निराळे आहे.
पट्टडकल मंदिरांचे स्थापत्य हे भारतीय स्थापत्यशास्त्राच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानी स्थापत्य यांचा एक मिलाफ या मंदिरांच्यात झालेला दिसतो असे जाणकार म्हणतात. मला स्थापत्यातली काही विशेष जाण नसल्याने मला याबद्दल फारसे काही लिहिणे शक्य नाही. ऐहोले आणि पट्टडकल मंदिरांची मी मनात तुलना करतो आहे. पट्टडकल मंदिरांचे स्थापत्य जरी खूपच उजवे असले तरी भित्तीशिल्पे किंवा रिलिफ्स मधे मात्र मला फरक जाणवतो आहे. ऐहोले मधली सर्व शिल्पे हाय रिलिफ प्रकारची असल्याने जास्त जिवंत वाटतात असे मला वाटते. पट्टडकलला असलेली हाय रिलिफ शिल्पे सोडली तर मंदिराच्या आतली सर्व शिल्पे मात्र बास रिलिफ आहेत. (अर्थात ऐहोलेला मंदिराच्या आत शिल्पेच नाहीत.) बास रिलिफ शिल्पे तेवढी जिवंत वाटत नाहीत असे मला वाटते.
पट्टडकलची भेट आटोपती घेऊन मी आता बदामी कडे निघालो आहे. तेथे पोचल्यावर प्रथम पेटपूजा, थोडी विश्रांती व नंतर बदामीच्या प्रसिद्ध गुहांतील मंदिरांना भेट द्यायची असा कार्यक्रम आहे.
19 फेब्रुवारी 2011

2 comments:

  1. लेख खूप माहितीपूर्ण आहे. फोटोही छान आहेत. युगुलांचे वर्णन पटले नाही.

    ReplyDelete
  2. प्रभाकर फडणीस
    प्रतिसादासाठी धन्यवाद. युगुलांचे वर्णन आपल्याला पटले नाही हे समजले. परंतु हे वर्णन मी आमच्या तेथे असलेल्या मार्गदर्शकाच्या सांगण्यावर साधारण आधारालेले आहे. आपल्याला यातला कोणता भाग खटकला हे कळल्यास बरे पडेल.

    ReplyDelete