Monday, January 23, 2012

Oh! My beloved city Paradise

Quantcast It is generally believed now,  that the Aryan or Vedic culture spread in the Indian Subcontinent, from around 1300 BC onwards. It is an astonishing fact that towards northwest of Indian subcontinent and beyond Hindukush mountain ranges, a similar culture or religion, which could be considered as a sister culture to the Aryan or Vedic culture, was developing simultaneously. This new, fire worshiping culture or religion, rapidly grew and spread widely under leadership of Prophet Zarathustra (Zoroaster) in the eastern region of present day Iran and south Afghanistan. The basic tenets of this new religion were incorporated by the Prophet in the book called Avesta in form of hymns which are called as Gathas. This region was divided into four kingdoms of Bactria, Medes, Parthia and Persia in those days. It is believed that all these were actually vassal kingdoms of the Assyrian empire. It is difficult to say, as the history of this region from this period is rather obscure, that in which of these four kingdoms Prophet Zarathustra's new religion was more popular.

भारतीय द्वीपकल्पात आर्य किंवा वैदिक संस्कृतीचा प्रसार इ..पूर्व 1300 पासून सुरू झाला असे आता सर्वसाधारणपणे मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या द्वीपकल्पाच्या वायव्येला असलेल्या व हिंदुकुश पर्वतराजींच्या पलीकडच्या बाजूस या वैदिक संस्कृतीची सख्खी बहीण शोभेल अशी एक संस्कृती किंवा एक धर्म याच सुमारास उदयास येत होता. सध्याच्या इराणचा पूर्वेकडचा भाग व अफगाणिस्तानचा दक्षिणेकडचा भाग या मधे झरतृष्ट या प्रेषिताच्या किंवा धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली या नवीन अग्निपूजक संस्कृतीचा किंवा धर्माचा झपाट्याने प्रसार होत गेला. या धर्मगुरूने आपल्या या धर्माचे सार, अव्हेस्ता या धर्मग्रंथामधे लिहिलेल्या गाथांमधे सांगितलेले आहे. त्या काळी या भूप्रदेशात, बाल्ख(Bactria), मदा(Medes), पार्थवा(Parthia) व पर्शिया(Persia) अशी चार स्वतंत्र राज्ये होती व त्यांची आपापसात सतत युद्धे चालू असत. ही राज्ये, सध्याच्या इराक मधील भागात असलेल्या असुरी (Assyrian) साम्राज्याची मांडलिक राज्ये होती असे मानले जाते. या राज्यांपैकी कोणत्या राज्यामधे झरतृष्ट्राचा हा धर्म जास्त लोकप्रिय होता हे सांगणे, या कालातला इतिहास अतिशय धूसर असल्याने, अतिशय अवघड आहे.


..पूर्व 648 मधे त्यावेळेस पर्शियाच्या गादीवर आलेला राजा कुरुश(Cyrus) याने आजूबाजूंच्या राज्यांवर आक्रमणे करून त्यांचा युद्धांमधे पराभव केला व त्यांना आपली मांडलिक राज्ये करून घेतली व स्वत:चे अखमनशाही(Achaemenes ) साम्राज्य स्थापन केले. या कुरुश राजाने झरतृष्टाच्या कालानंतर जवळजवळ 500 ते 700 वर्षांनंतर, प्रथम अधिकृत रित्या, झरतृष्टाच्या धर्माला आपल्या राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली. त्यामुळे हा धर्म पुढे पर्शियाचा किंवा पारशी धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला व अव्हेस्ता हा या धर्माचा सर्वात महत्वाचा धर्मग्रंथ म्हणून मानला जाऊ लागला 

.
चित्र क्र. 1 अखमन साम्राज्य
..पूर्व 648 मधे स्थापन झालेले अखमनशाही साम्राज्य, ..पूर्व 330 पर्यंत म्हणजे तिसरा दरुष(Darius III) हा राजा गादीवर असेपर्यंत म्हणजे सुमारे 318 वर्षे अस्तित्वात होते. या साम्राज्याचा विस्तार पूर्वेला सिंधू नदीच्या काठापासून ते उत्तरेला अमु दर्या नदीच्या पलीकडे, दक्षिणेला इराणच्या खाडीपर्यंत व पश्चिमेला पार डॅन्य़ूब नदीच्या मुखापर्यंत पसरला होता. राज्यकारभाराचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक भागासाठी क्षत्रप या मांडलिक राजाची नियुक्ती हे याच साम्राज्यात प्रथम अस्तित्वात आणले गेले. स्थिरता व उत्तम राज्यकारभार यामुळे या साम्राज्यात मोठी सुबत्ता होती. कलांना व स्थापत्याला अखमनशाही राजांनी अतिशय प्रोत्साहन दिल्याने हे साम्राज्य सांस्कृतिक व सर्व कलागुणांना प्रोत्साहन देणारे एक साम्राज्य असे मानले जाते. या राज्याचा संस्थापक कुरुश या राजाने आपल्या राज्याची राजधानी पाथ्रागड (Pasargadae ) येथे स्थापन करण्याचे ठरवले. परंतु त्याच्या हातून हे काम पूर्ण झाले नाही. युद्धात त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचे दफन येथे करून या ठिकाणी त्याचे स्मारक उभारण्यात आले .

.
चित्र क्र. 2 पारसा शहराचा लेआऊट
चित्र क्र. 3 पारसा शहराच्या अवशेषांचे विहंगम दृष्य
पहिला दरुष या अखमनशाही राजाने आपली राजधानी पारसा(Persepolis) किंवा तख्त- - जमशेद या ठिकाणी इ..पूर्व 550 मधे स्थापण्याचे ठरवले. हे ठिकाण सध्याच्या इराणमधल्या शिराझ या शहराच्या सुमारे 70 किलोमीटर इशान्येला येते. या वर्षापासून ते इ..पूर्व 330 पर्यंत म्हणजे 220 वर्षे, हे शहर शक्तीमान अशा अखमनशाही साम्राज्याची राजधानी होते. खशायरशा (Xerex) या अखमनशाही राजाने पारसाच्या भव्य स्थापत्यात मोठी मोलाची भर घातली. अखमनशाही साम्राज्याच्या कोंदणातले पारसा हे सर्वोत्तम रत्न होते याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. या शहराबद्दल जास्त माहीती करून घेण्यासाठी या लेखाचा प्रपंच.

चित्र क्र. 4 पारसा शहराचा संगणकाच्या सहाय्याने तयार केलेला त्रिमिती देखावा
पारसा शहर पुलवर या कुर-आब नदीच्या एका उपनदीच्या काठी वसवलेले होते. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे ते नदीच्या पात्राच्या पातळीला न वसवता, या पातळीपासून 20 मीटर उंच व 1,25000 वर्ग मीटर एवढ्या क्षेत्रफळाच्या अशा एका विस्तृत चौथर्‍यावर वसवले गेले होते. हा चौथरा निर्माण करण्यासाठी एका बाजूला असलेल्या कुह- - रहमत या पर्वताचा आधार घेण्यात आला होता तर बाकी सर्व बाजूंना, 5 ते 13 मीटर उंचीच्या रुंद भिंती बांधून त्यावर हा चौथरा बांधण्यात आला होता. मधली सर्व जागा धातूंच्या पट्ट्यांनी एकमेकांना जखडलेले मोठे पाषाण, दगड, मुरुम व माती यानी भरून घेऊन, अतिशय सपाट असा हा चौथरा एवढ्या उंचीवर बनवला गेला होता. ..पूर्व 518 मधे या चौथर्‍यावर प्रवेश करण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे किंवा प्रवेश जिन्याचे काम शहराच्या पश्चिम सीमेवर सुरू झाले. हा जिना दुहेरी होता व 20 मीटर उंचीचा होता.या जिन्याला अंदाजे 7 मीटर रुंद व फक्त 31 से.मी. उंच अशा 111 पायर्‍या होत्या. पायर्‍यांची उंची इतकी कमी ठेवण्याचे कारण असे मानले जाते की शहरात प्रवेश करणार्‍या व शाही इतमाम व उंची वस्त्रे परिधान केलेल्या शाही पाहुण्यांना त्यांचा राजेशाही थाट बिघडू न देता व घामाघूम न होता सहजतेने हा जिना चढता यावा.

चित्र क्र. 5 खालच्या पातळीवरून पारसा शहराचा चौथरा (प्रवेश जिना डाव्या बाजूला)
आपण जर अशी कल्पना केली की आपणच असे शाही पाहुणे आहोत व हा जिना चढून वर आलो आहोत. तर वर आल्यावर आपल्याला काय दिसले असते? हा भव्य जिना चढून आल्यावर प्रथम दिसली असती थोडी मोकळी जागा व त्याच्या मागे असलेले 14 मीटर उंचीचे विशाल राजद्वार. या राजद्वाराचे नाव होते सर्व राष्ट्रांचे द्वार(Gate of all Nations). या द्वाराच्या दोन्ही बाजूंना 7 मीटर उंचीचे दोन वृषभ राखण करण्यासाठी म्हणून स्थापन केलेले होते. या राजद्वाराचा उल्लेख काहीजण खशायरशा सम्राटाचे द्वार म्हणून करतात कारण या द्वारावर खशायरशा या सम्राटाने मी महान खशायरशा , सर्वात श्रेष्ठ, अनेक राजांचा राजा व या दूरवर व सभोवती पसरलेल्या महान पृथ्वीचा राजा, असा आहे.” 
हा शिलालेख कोरून घेतलेला आहे 

.
चित्र क्र. 6 संगणकाद्वारे निर्माण केलेले सर्व राष्ट्रांचे प्रवेशद्वार
या दारातून आपण आत शिरलो असतो की समोर दिसले असते एक आयुष्यातील सुखे हेच परमोच्च मानणारे, सुखप्राप्तीसाठी वाटेल ती किंमत देणारे व कल्पनाही करता येणार नाही असे एक जग. समोर दिसणार्‍या चित्रातील या उंच चौथर्‍यावरच्या इमारतींची प्रमाणबद्धता, भव्यता बघून आश्चर्यचकित व्हावे का पदोपदी दिसणार्‍या तिथल्या वैभवाच्या खुणा बघून स्तिमित व्हावे असेच आपल्याला वाटले असते. या साम्राज्याच्या वैभवाला व किर्तीला साजेसे असलेली राजधानी बांधण्याची किमया अखमनशाही स्थापत्यविशारदांनी मोठ्या उत्तम रितीने साधली होती. अखमन साम्राज्याच्या शक्तीचे व वैभवाचे ही राजधानी हे एक सांकेतिक चिन्ह होते. दर्शक अतिशय भारावून जावा असेच ते बांधलेले होते. सर्व अधिकृत कार्यक्रम राजेशाही थाटाचे करता यावेत व ते तसे झालेले लोकांना दिसावेत अशा पद्धतीनेच पारसा चे स्थापत्य आहे.

चित्र क्र. 7 प्रवेश जिना, सर्व राष्ट्रांचे प्रवेश द्वार व उजव्या बाजूस आपादना (संगणक निर्मित)
चित्र क्र.8 आपादना स्थापत्य (संगणक निर्मिती)
चित्र क्र.9 आपादना अवशेष
द्वारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला दिसत असे एक अवाढव्य स्थापत्य. हे स्थापत्य आपादनाया नावाने ओळखले जात असे. पारसा मधल्या स्थापत्यांमधले सर्वात भव्य व मनावर ठसा उठवणारे स्थापत्य हेच होते असे मानले जाते. या सभागृहाच्या मध्यभागी, एक चौरस आकाराचा, 60 फूट उंच अशा 36 खांबांनी आधार दिलेले छत असलेला एक कक्ष होता. या खांबांच्या शिरावर बसवलेले महाकाय लाकडी घोडे व पक्षी या छताला आधार देत असत. या चौरस कक्षाच्या बाहेर अनेक व्हरांडे , जिने व गच्च्या होत्या. साम्राज्याच्या कानाकोपर्‍यातून सम्राटाकडे आपली गार्‍हाणी घेऊन येणार्‍या प्रजेला व शिष्टमंडळांना (काही शिष्टमंडळे हजार हजार लोकांची सुद्धा असत.) अखमनशाही सम्राट या आपादनामधेच भेटत असत. ‘आपादनामधल्या भिंती, रंगीबेरंगी व चमकणार्‍या अशा टाइल्सनी सजवलेल्या होत्या. तसेच या भिंतींच्या वर निरनिराळ्या प्रतिष्ठित व्यक्ती, योद्धे, सैनिक व मांडलिक राजे यांची पूर्णाकृती चित्रे कोरलेली होती.

चित्र क्र. 10 आपादना प्रवेश कक्ष
चित्र क्र, 11 आपादना छताचे आधार
चित्र क्र.12 आपादना छत
आपादना सभागृहाच्या आग्नेय कोपर्‍यात तचेरा ( Tachera) या नावाची एक लहान आकाराची वास्तू होती. ही वास्तू ग्रॅनाइट व संगमरवर सारख्या पाषाणांच्यामधून अत्यंत सौंदर्यपूर्ण पद्धतीने बनवलेली होती. या वास्तूचे प्रयोजन काय होते हे अचूकपणे सांगता येत नाही परंतु या वास्तूत सम्राट आपल्या कुटुंबातील नवरोज सारखे धार्मिक विधी करत असत व आपले सेनानी, मंत्री व शासकीय अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करत असत असे मानले जाते त्यामुळे या वास्तूला मुगल रिवाजाप्रमाणे दिवाण- -खास असे म्हणणे योग्य ठरावे. या वास्तूच्या खांबांच्या व भिंतींच्या अवशेषांवर अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींची चित्रे कोरलेली आहेत. तसेच या वास्तूला आधार देणार्‍या खांबांच्या शिरावर मानवी मस्तकाच्या आकाराचे आधार बसवलेले होते.

चित्र क्र. 13, 100 खांबांच्या दरबार हॉलचे पटांगण
चित्र क्र. 14, 100 खांबाच्या हॉलचा प्रवेश विभाग
चित्र क्र.15, 100 खांबांच्या हॉलचे अवशेष
आपादनाया खुल्या सभागृहाच्या पूर्वेला 100 खांब असलेले एक मोठे स्थापत्य किंवा हॉल होता. या वास्तूची भव्यता फक्त आपादनाच्या मानाने कमी होती एवढेच. परंतु या वास्तूच्या मध्यभागी असलेला कक्ष मात्र आपादनापेक्षाही मोठा होता. या वास्तूवरचे छत हे 100, तीन रंगात रंगवलेल्या लाकडी खांबांच्या आधारावर बसवलेले होते. हे सर्व खांब भव्य व कोरीव काम केलेल्या पाषाणांच्या खोबणींच्यात बसवलेले होते. एका पाषाणात असे 10 खांब बसवलेले होते. हे लाकडी खांब 14 मीटर उंच होते. मध्यवर्ती दरबार हॉल कक्षात प्रवेश करण्यासाठी 12 पाषाण द्वारे बसवलेली होती. या द्वारांच्यावर, अखमनशाही राजे निरनिराळ्या राक्षसांशी युद्ध करत असल्याची चित्रे कोरलेली होती. पारसा मधल्या सर्वच कोरीव कामामधे असे राक्षस व रानटी जनावरे यांची चित्रे दिसतात. या सभागृहात प्रवेश केल्यावर सम्राटाला आदर दाखवण्यासाठी तळहात कपड्यांच्या बाह्यांच्या आत दडवून व नतमस्तक होऊनच चालणे आवश्यक असे. या सभागृहामधेच सम्राटाचे सिंहासन ठेवलेले असे. या सिंहासनावरचे किंवा इतर कोरीव काम सम्राट सभागृहात नसतानाच बघणे शक्य होते. सम्राटाच्या उपस्थितीत हा अत्यंत मोठा अनादर मानला जात असे. हा कक्ष म्हणजे सम्राटाचा दिवाण-- आम होता असे म्हणता येईल.
सिंहासन असलेल्या सभागृहाच्या साधारण नैऋत्येला व चौथर्‍यावरील सर्वात उंच अशा भागावर अखमनशाही सम्राटांची निवासस्थाने बांधलेली होती. खशायरशा या सम्राटाचे निवासस्थान अतिशय कौशल्यपूर्ण कारागिरीने बांधलेले होते. 36 खांबांच्या आधारावर बांधलेल्या या इमारतीत एक मुख्य दिवाणखाना, इतर काही कक्ष, अनेक खांबांच्या आधारावर बांधलेली एक गच्ची होती. या निवासस्थानाच्या कांम्पाऊंड भिंतीला लागून असलेल्या बाजूला राणी महाल किंवा जनानखान्याचे कक्ष बांधलेले होते. बाजूला असलेल्या दुसर्‍या एका इमारतीत, बहुदा मुदपाक खाना व भोजन गृह होते कारण या इमारतीच्या भिंतींच्यावर खाद्यपदार्थ घेऊन जाणार्‍या सेवकांची चित्रे कोरलेली होती. सम्राटांच्या मेजवान्या याच इमारतीत दिल्या जात. या इमारतीच्या बाहेर असलेल्या अंगणात खशायरशा या सम्राटाचा एक पूर्णाकृती पुतळा बसवलेला होता. .. पूर्व 330 मधे अलेक्झांडरने हे शहर जिंकल्यावर त्याची मोडतोड करण्यात आली.

चित्र क्र.16, राजकोषावरची चित्रकला
या इमारतीच्या बाजूलाच व राज सिंहासन ठेवलेल्या 100 खांबांच्या दरबार हॉलच्या मागच्या बाजूस, राजकोषाची इमारत होती. अखमनशाही सम्राटांची संपत्ती या इमारतीत सुरक्षित ठेवलेली असे. याच इमारतीत सम्राटाच्या शरीरसंरक्षकांच्या तुकड्यांचे शस्त्रागारही होते. या राजकोषाच्या भिंतीवर अखमन सम्राटांची सुंदर चित्रे रंगवलेली होती. ..पूर्व 330 मधे अलेक्झांडरने जेंव्हा पारसा शहर ताब्यात घेतले तेंव्हा त्याला या इमारतीत 1,20000 सोन्याच्या विटा मिळाल्या होत्या. अखमनशाही सम्राट, सोन्याची नाणी फक्त जेंव्हा काही मोठा प्रकल्प हातात घेतला असे त्यावेळी बनवून खर्चासाठी वापरत असत. अन्यथा सर्व सोने विटांच्या स्वरूपात साठवले जाई.

चित्र क्र. 17, शाही मेजवानी कक्षाचे प्रवेशद्वार
चित्र क्र. 18, जनानखाना किंवा राणी महाल
पारसा शहराच्या चौथर्‍यावरून पूर्व दिशा सोडून बाकी कोणत्याही दिशेला बघितले तरी हिरवेगार असलेले नदीचे खोरे दृष्टीक्षेपात येत असे व त्यामुळे हा सर्व परिसर अतिशय रमणीय भासत असे. सर्व इमारती व रस्ते हे उत्कृष्ट शिल्पकलेच्या नमुन्यांनी सजवलेले दिसत असत. सुबत्तेच्या या खुणा, अखमनशाही सम्राटांची ही राजधानी मोठ्या गर्वाने आपल्याला अंगाखांद्यांच्यावर बाळगते आहे हे लगेच लक्षात येत असे.
हे सुंदर शहर अलेक्झांडरच्या सैन्याने जिंकून ताब्यात घेतल्यावर अलेक्झांडरची अशी अपेक्षा होती की हा विजय मिळवल्यावर पारसा मधल्या लोकांच्या मनात त्याला अखमनशाही सम्राटाचे स्थान मिळेल. मात्र त्याची ही अपेक्षा फोल ठरली. असे झाल्यामुळे अलेक्झांडर अतिशय निराश झाला व रागावला. अलेक्झांडर दारूच्या नशेत असताना त्याने प्रथम आपल्या सैनिकांना शहर लुटण्याची परवानगी दिली. यानंतरही पारसा च्या नागरिकांनी अलेक्झांडरला सम्राट म्हणून मानण्याचे मान्य केलेच नाही. त्यांच्या लेखी तो फक्त एक ग्रीक लुटारूच राहिला. लढाई जिंकली असल्याने मौज मजा करण्यासाठी मदिरेबरोबर काही ग्रीक वेश्यांना पाचारण करण्यात आले होते. या पैकी एका स्त्रीने, दारूच्या नशेत, अलेक्झांडरला हे पारसा शहर जाळून टाकण्याची प्रथम विनंती केली. अलेक्झांडर स्वत: दारूच्या नशेतच होता व त्याचा स्वत:वरील ताबा पूर्णपणे सुटलेला होता. तशा परिस्थितीत त्याने या स्त्रीची विनंती लगेच मान्य केली व स्वत: तो आणि ती स्त्री यांनी प्रथम या शहराला आग लावली. हे झाल्यावर अखेरीस त्याने सैन्याला हे सुंदर शहर जाळून नष्ट करण्याची आज्ञा दिली.
..पूर्व 330 मधे या सुंदर शहराचे शेवटी भग्नावस्थेत रूपांतर झाले.
22 ओक्टोबर 2010

No comments:

Post a Comment