Saturday, December 31, 2011

Remember the time

My mind always gets an intense feeling of an unknown longing or yearning, whenever any pleasant experience, being enjoyed by me, is nearing to an end. When I am on a holiday or a pleasure tour and I have spent few days having great fun, suddenly, on a relaxed evening, my mind gets this feeling of yearning. I might be enjoying a programme scheduled for the evening. Yet, my mind becomes acutely aware rhat all this is going to end today and I have to return home next day. Once this feeling engrosses my mind, and even though I am physically away from my home, my mind already reaches home where daily problems and tasks start facing me. I then normally  try, to counsel my mind, by thinking about the next tour or holiday, which I can take up in future.
Few days back, my daughter, who is settled abroad, came for a visit to India. The time just flew those few days. As the day of her departure from India came nearer, I had similar feeling of yearning in my mind. After she and my grand daughters left, my house had become for a day or two, a torturing hell for me. It took few days, for things to return to normal. कोणताही सुखद अनुभव संपत आला की एक अनामिक हुरहुर नेहमीच माझ्या मनात दाटून येते. आपण एखाद्या प्रवासाला किंवा सुट्टीवर आलेलो असतो, चार दिवस मोठे मजेत जातात. वेळ कसा गेला ते कळतही नाही आणि अचानक एक संध्याकाळ उमलते. ती भरात असतानाच लक्षात येते की उद्या परत जायचे आहे. आणि मग त्या संध्याकाळची मजा अनुभवत असतानाच, एकीकडे मनात आता उद्या परत जायचे आहे ही भावना रुंजी घालू लागते. मग आपले सगळे लक्ष उद्याकडेच लागते. रोजच्या आयुष्यातले प्रश्न आपल्याला परत एकदा भेडसावू लागतात. शक्य तितक्या लवकर परत आणखी एकदा, दुसर्‍या कोणत्या तरी प्रवासाला यायचेच असा निर्धार करून आपण मनाची समजूत काढायचा प्रयत्न करतो. पण शरीराने आपण जरी त्या क्षणी सुट्टीवर असलो तरी मन केंव्हाच घरी पोचलेले असते.
परदेशात असलेली माझी मुलगी मध्यंतरी भारतात सुट्टीवर आली होती. मुलगी, नाती यांच्या सहवासात चार दिवस कसे उडून गेले ते कळले सुद्धा नाही. मात्र ती जायच्या दिवशी घर अक्षरश: खायला उठले होते. रितेपणाची एक भावना मनात ठाण मांडून बसली होती. रोजचे रूटीन चालू व्हायला परत मधे दोन चार दिवस जावे लागले होते.

दर वर्षी डिसेंबर महिना संपत आला की माझ्या मनाला अशीच एक हुरहुर लागते. आयुष्यातले आणखी एक वर्ष संपल्याची ती जाणीव असते. थोड्याच कालात सुरू होणार्‍या नववर्षाचा आनंद न होता काहीतरी हातातून निसटून चालले आहे हेच जाणवत राहते. खरे तर हे संपणारे सध्याचे वर्ष माझ्या दृष्टीने खूप चांगले गेले आहे. कित्येक वर्षांपासून मनात असलेला लेह-लडाखचा प्रवास मला या वर्षी सुखरूपपणे तडीस नेता आला आहे. हंपी-बदामीची सहल मी याच वर्षी मी करू शकलो आहे. गेली दोन तीन वर्षे मनात असलेल्या दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या भेटीचा योग अखेरीस आल्याने सर ऑरेल स्टाइन यांनी चीनच्या शिंजियांग भागातून जमा केलेल्या वस्तू बघण्याचे भाग्य मला याच वर्षी लाभले आहे. या संग्रहाबद्दलची माझी मालिका याच वर्षी माझ्या हातून लिहून झालेली आहे. दिवाळीच्या वेळेस दक्षिण सह्याद्रीमधील सहल मी या वर्षीच पार पाडू शकलो आहे. घरात आवश्यक असलेल्या काही गोष्टींची खरेदीही मला या वर्षी करता आली आहे. भरपूर लेखन माझ्या हातून या वर्षी घडले आहे. त्यामुळे मी म्हटले तर समाधानी आहे. परंतु हे सगळे पुढच्या वर्षी मी करू शकेन की नाही? अशी एक काळजी उगीचच मला वाटते आहे. आयुष्याचा आनंद पूर्णपणे अनुभवायचा असला तर तब्येत ठणठणीत पाहिजे. आतापर्यंत तरी ती तशी राखता आली आहे. पुढच्या वर्षी ती तशीच राहिली तरच मनासारख्या गोष्टी घडू शकतात हे मला उमजते आहे.
आज हे वर्ष संपत आले असताना केलेल्या या सगळ्या प्रवासांतील काही अवीट क्षण मला सारखे स्मरत आहेत. लडाखमधल्या खारडुंग ला मध्ये अनुभवलेले हिम वर्षावाचे आणि दृष्टीला सहसा न पडणारी काराकोरम पर्वतराजीची उत्तुंग शिखरे बघितल्याचे क्षण, नुब्रा व्हॅलीमधे हॉट स्प्रिंग्ज येथे, सॉल्टेरो पर्वतराजी समोर उभे राहून घालवलेले क्षण किंवा पॅन्गॉन्ग सरोवराच्या काठी उभे राहून समोर दिसणार्‍या उत्तुंग पर्वतराजींमध्ये, 1962च्या लढाईमुळे पावन झालेली गुरुंग टेकडी शोधण्यात घालवलेले क्षण किंवा सिंधु नदीचे प्रथम दर्शन झाले तो क्षण हे मी आयुष्यात कधीही विसरणे शक्य नाही. हे क्षण मला ज्या वर्षाने मिळवून दिले ते माझ्या हातातून निसटते आहे या जाणीवेने कदाचित माझ्या मनाला ही हुरहुर लागली आहे.
पुढच्या वर्षी नवीन काय बघणे शक्य होईल? याची भविष्यवाणी करणे मोठे कठिण काम आहे. पुण्याजवळ असलेल्या नाणेघाटाची एक छोटीशी सफर मागच्या जून महिन्यात केल्यावर, सातवाहन राजांबद्दलच्या एक मालिकेचे लेखन मी सुरू केले आहे. त्यातले पहिले काही भाग माझ्या हातून लिहिले गेले असले तरी पुढचे भाग लिहिण्यासाठी आवश्यक असलेला महाराष्ट्रामधीलच प्रवास मला करता आला नाहीये. त्यामुळे तो प्रकल्प मात्र या वर्षी पूर्ण होऊ शकलेला नाहीये. पुढच्या वर्षी हा प्रवास करून ही मालिका पूर्ण करता आली तर मला हवे आहे. तसेच ईशान्य एशिया मध्ये एखादी चक्कर टाकता आली तर ती टाकायची आहे. बघूया काय जमते ते?
पुढे भविष्यात प्रवास, लेखन जमेल वा न जमेल! परंतु या या वर्षाच्या अखेरीच्या काही तासांत या वर्षी अनुभवलेला मनसोक्त आनंद आठवण्याचा तरी एक प्रयत्न मी येथे करतो आहे. महाराष्ट्राचे प्रख्यात कवी ग.दि.माडगुळकर यांच्याच शब्दात सांगायचे तर
या रम्य सांजवेळी दिन संपला स्मरावा /
मनसोक्त भोगलेला आनंद आठवावा //
माझ्या सर्व वाचकांना येणारे नववर्ष, सौख्याचे व समाधानाचे जावो अशी इच्छा व्यक्त करून या वर्षातले माझे हे शेवटचे लेखन संपवतो. भेटूच परत पुढच्या वर्षी!
31 डिसेंबर 2011

No comments:

Post a Comment