Tuesday, December 13, 2011

Relatives, relations and relationships

Quantcast Few years ago, I had gone to visit the Indian city of Hyderabad. I came to know then,  that Hyderabad's famous 'Salarjung Museum' has now been shifted to a new building.  I knew that, with this new building, display of the artifacts and other stuff,  would be far better than before and I had made it a point to visit the Museum once again then. In one of the halls of the Museum, I had found  the old dresses worn by the Nizam of Hyderabad, neatly displayed in glass showcases. The dresses made from silks, were heavily brocaded with gold and silver threads and studded with priceless jewels. In the bright spot- lights arranged to show off the dresses, the jewels were shining brightly. 
I had then thought that though observing these dresses displayed in glass show cases was a wonderful experience, I would not have liked wearing these dresses at all. The gold and silver thread would have rubbed against my skin while moving about and the bright jewels would be like thorns pricking me all the time. Few days back, there was some unsavoury incidence amongst some relatives of mine. While thinking about the incidence, I thought that the relationships with relatives are really like wearing those brocaded dresses. The relationships are pleasant only from a distance. 

काही वर्षांपूर्वी हैदराबादला गेलो होतो त्या वेळी, तिथले जगप्रसिध्द सालारजंग संग्रहालय नव्या वास्तूत गेले आहे असे समजल्याने, लक्षात ठेवून ते मुद्दाम परत बघायला गेलो होतो. तिथली दालने बघत असताना एका दालनात खुद्द निझाम व त्याचे सरदार यांचे रत्नखचित अंगरखे चौकटींच्यात मांडून ठेवलेले दिसले.ह्या अंगरख्यांवर सोन्या-चांदीच्या तारेने कशीदा तर काढलेला होताच पण त्या शिवाय निरनिराळी रत्नेही जडवलेली होती. दिव्यांच्या प्रकाशात हा कशीदा व रत्ने मोठी चमचम करताना दिसत होती. त्याच वेळी मनात विचार आला होता की असे चौकटीत मांडून ठेवलेले हे अंगरखे बघायला जरी मोठे मोहक दिसत असले तरी ते अंगाखांद्यावर वापरणे मोठे कर्म कठिण काम आहे. अंगाला तो कशीदा सारखा घासणार, ती रत्ने उठता बसताना टोचणार, वेळप्रसंगी अंगातून रक्तही काढणार. तेंव्हा त्यांच्यापासून मी लांब आहे तोच बरा. परवा सहज विचार करत असताना असे लक्षात आले की अरे! आपली नाती गोती पण या अंगरख्यांसारखीच आहेत की! जोपर्यंत ती लांब चौकटीत मांडलेली होती तोपर्यंत अशीच मनाला सुखद वाटत होती. अंगाखांद्यावर वावरण्याची वेळ आल्यावर ती पण अशीच घासू आणि टोचू लागली आहेत. एखादे वेळी ओरखडा व रक्ताचा थेंब सुध्दा दिसतो आहे. ग़ोत्यांत नेतात ती नाती हे मनाला पटू लागले आहे.

या नात्यांच्यात प्रकार तरी किती असावेत? रक्ताची नाती, व्यावहारिक नाती आणि या शिवाय मानलेली नाती. आमच्या परिचयातल्या एका बाईंना स्वत:चे सख्खे भाऊ बहिण असले तरी त्यांचा एक मानलेला भाऊ पण आहे. आता मानलेला भाऊ म्हणला की मानलेली वहिनी, मानलेल्या भाच्या व आता मानलेली नातवंडे ही सगळी आलीच. आता या मानलेल्या भावाने जर कुत्रा पाळला तर त्याला, तो खरा असला तरी, मानलेला कुत्रा म्हणायचे का? असा एक वात्रट प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला तो आपण सोडून देऊ. या बाईंच्याकडच्या कोणत्याही सणासमारंभाला एखादेवेळेस सख्ख्या भावा बहिणीला त्या बोलावणार नाहीत पण मानलेले कुटुंब नेहमी हजर असते. आता या नाते-संबंधाला काय म्हणायचे? व्यावहारिक नात्यांची तर निराळीच तऱ्हा असते. मात्र या बाबतीत हे बेटे पाश्चिमात्य लोक मात्र मोठे हुशार आहेत. नाते संबंधांना नांवे देताना Brother-in-law, Mother-in law, Daughter-in-law अशी अगदी जवळीक दिसणारी नावे ठेवायची पण प्रत्यक्षांत लग्नाच्या स्वागत समारंभात एकदा तोंड वेंगाडून हसून दाखवले की त्यानंतर परत हे भाउ, आई व मुलगी यांची भेट सुध्दा होणे जरा कठिणच. व्याही किंवा विहिण या बिरूदाची कोणी व्यक्ती असू शकते हेच मुळी हे लोक नाकारतात.यांच्या शब्दकोशात अश्या व्यक्तींना मुळी शब्दच नाही. पाश्चिमात्य नात्यांचा शब्दकोश आई ,वडील भाऊ, बहिण आणि नाईलाजच असतो म्हणून आजी- आजोबा यांच्या पुढे जातच नाही.
आपल्याकडचा घोळ या उलट असतो.व्यावहारिक नात्यांसाठी परंपरेने चालत आलेली नावे, मला तरी अगदी योग्य वाटतात. सासू, सासरा, जावई किंवा सून या नांवात खोटी बेगडी जवळीक अजिबात दिसत नाही पण परस्पर ( असल्यास) जिव्हाळा व आदर जरूर दिसतो. नाहीतर सासूला आई आई म्हणून सम्बोधायचे आणि प्रत्यक्षांत ही आई आणि तिची ही मुलगी यांच्यातून विस्तव सुध्दा जात नसतो. आपल्याकडे नाती तरी किती? मामाच्या बायकोला मामी का म्हणायचे? तिचे आपल्याशी खरे नाते काय? नवऱ्याचा पुतण्या हा बायकोचा पुतण्या कसा होऊ शकतो? हा गोतावळा आपण कशासाठी निर्माण करतो आणि सांभाळतो? रक्ताची नाती हीच तर खरी नाती असतात. आपण आजारी पडलो मोठया संकटात पडलो तर आठवण कोणाची होते? आई, वडील व ते गेल्यावर भाऊ किंवा बहिण. मला तर असे वाटते की ही नाती सोडली तर बाकीच्यांना नातेवाईक म्हणावे, म्हणजे कोणतीच अपेक्षा नाही आणि कोणताच राग नाही किंवा लोभ नाही.
मुलगा किंवा मुलगी ही नाती आणखी निराळया पातळीवरची. थोडीशी एक दिशा मार्गासारखी. कितीही प्रयत्न केला तरी या नात्यांपासून अपेक्षा दूर करणे कोणालाच शक्य होत नाही. जो पर्यंत मुले एकटीच असतात तो पर्यंत ती तुमच्याच कुटुंबाचा भाग असतात आणि अपेक्षा सर्व साधारणपणे पूर्ण करतात. पण एकदा त्यांनी स्वत:चा संसार मांडला की तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना जमतेच असे नाही. मुलांच्याकडून झालेला अपेक्षा भंग मोठा जीव घेणा असतो.त्यातून त्यांचा सहचर किंवा सहचारिणी हे मनमिळाऊ असले तर सर्व ठीक चालते नाहीतर सगळेच उर्वरीत आयुष्य नासून जाते.
हीच जर खरी नाती असली तर पती-पत्नीच्या नात्याचे काय? ते दोघे तर एकच आयुष्य घालवत असतात. त्यांचीच तर आयुष्यांत एकमेकाला खरी सोबत असते. त्यांच्यात नाते असे नसतेच. असते ती एकात्मता. आयुष्यांची वर्षे एकदा सरू लागली की आपल्या सगळया नातेसंबंधावरचा मुलामा केंव्हाच उडून गेला आहे हे लक्षांत येऊ लागते.मग उरतात ती दोघेच! आयुष्य नावाच्या एका बेटांवर! हा नातेसंबंधांचा मुलामा एकदा उडला की मग दोघाच्याही लक्षात येऊ लागते की आपण किती एकटे आहोत ते. काही पती पत्नींच्या वयात खूप अंतर असते. अशा वेळी एकमेकाबद्दल कितीही प्रेम व जिव्हाळा असला तरी आयुष्यांकडे बघण्याच्या दोघांच्या दृष्टीत फरक पडत जातो. अशा वेळी तो नवरा , त्याची बायको जरी त्याच्या बरोबरच असली, तरी एकटा पडत जातो. आयुष्याच्या या सांजसमयी मग हात देतात समवयस्क मित्र-मैत्रिणी. मैत्रीमध्ये कोणतीच अपेक्षा नसते किंवा कर्तव्याची जाणीव नसते. मित्रांच्याबरोबर घालवलेले क्षण निखळ आनंद देत रहातात. एकटेपणा केंव्हाच बाजूला पडतो.
एकटे पडत चाललेल्या या माणसाने मग आधारासाठी बघायचे तरी कोणाकडे? कधी ना कधी त्याला या जगाचा निरोप हा घ्यावाच लागणार आहे. पण ती वेळ येईपर्यंत त्याने कोणाच्या आधारावर जगायचे? या बाबतीत एका लेखकाने मांडलेला एक विचार माझ्या मनाला मोठा भावून गेला आहे. त्या लेखकाची आई कालवश झाल्यावर लिहिलेल्या या लेखात तो म्हणतो ” आता मला मृत्यूची भिती अजिबात वाटत नाही. ज्या माझ्या आईने या जगात पहिली पाऊले टाकायला मला शिकवले तीच आता माझी तिकडे वाट पहाते आहे. तिकडे सुध्दा पहिली पावले टाकायला तीच मला शिकवणार आहे.”
आई असताना बाकी कोणाची पर्वा कशाला? ती या जगात असेल किंवा नसेलही.
(लेख पूर्व प्रकाशित)

No comments:

Post a Comment