Wednesday, December 28, 2011

Pseudonymes on the net;

Quantcast Blogging is becoming a very popular hobby in India. With more than 14 languages, Blogs are flourishing with full bloom. Even in my mother tongue, Marathi, it is becoming an accepted channel of communication. Yet, a blog post is essentially a personal memorandum or a reflection of what that individual writer thinks or what prevails in his mind at that time.Some people call a blog as a diary. It was a custom of yesteryear for learned people, to write a diary of sorts. Their writings were known as chronicles. Really speaking, the blogs of today on internet, are nothing but chronicles of that writer.The first thing that strikes me ,when I read any of these blogs is that the author is very honest or true to the words that he has put down. There are off course any number of bloggers, who try to popularize their blogs by pasting excerpts from prose or poetry of well known or famous authors. I would rather leave aside such blogs. Since a blog writer always accepts that whatever he has put down in his blog is truly his thinking, it always appears very honest and without any hidden agenda.
Besides writing individual blogs, another facility now exists for any amateur writer of today.This opportunity to write is offered by many forum type web-sites. You need to identify yourself with a name to be able to participate in such forums.Once you do that, you can raise a topic for discussion on such forums or offer freely your comments on anything under the sun. Many such forum participants, assume a Pseudonym or an anonymous name so that they can write incognito their thoughts freely and frankly. Something they might not do if writing with their own name and identity.मराठीमधे ब्लॉग्ज ही संकल्पना आता चांगलीच रुळली आहे. पण सर्वसाधारणपणे ब्लॉग्जवरचे लेखन हे वैयक्तिक लेखन असते. त्या व्यक्तीच्या मनातील विचारांचे ते प्रतिबिंब असते असे म्हणता येते. काही जण तर ब्लॉगला अनुदिनी म्हणतात. अनुदिनी या शब्दाचा अर्थ थोडासा रोजनिशी सारखा आहे. पूर्वी पुष्कळ मंडळी अशा प्रकारचे लेखन करत असत. त्यांच्या या लेखनाला क्रॉनिकल्स (Chronicles) असे म्हणत असत. आंतरजालावरचे ब्लॉग्ज किंवा अनुदिनी ही आधुनिक युगातील क्रॉनिकल्सच आहेत असे म्हटले तरी चालेल.
ब्लॉग्जवरचे लेखन वाचताना एक गोष्ट जाणवते की लेखक त्याच्या ब्लॉग्जवरील मजकूराशी प्रामाणिक असतो. अर्थात काही तथाकथित ब्लॉग लेखक, सुप्रसिद्ध कवी किंवा लेखक यांचे लिखाण आपल्या ब्लॉगवर डकवून आपला ब्लॉग लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण त्यांचे ब्लॉग्ज विचारात न घेता आपण सोडून देऊ. ब्लॉग्जवरचा मजकूर हा त्या ब्लॉगच्या लेखकाच्या मनातले विचार असल्याने व हे विचार माझे आहेत हे ब्लॉग लेखक मान्यच करत असल्याने कदाचित ब्लॉग्जवरचे लेखन, वाचकाला पटो वा न पटो, ते अतिशय प्रामाणिक वाटते यात शंकाच नाही.
या ब्लॉग्ज शिवाय, आंतरजालावर लेखन करण्याची आणखी एक नवीन संधी, फोरम किंवा चर्चास्थळ स्वरूपाच्या संकेतस्थळांकडून, आता मराठीतून लिहिण्याची ज्यांना खुमखुमी येते अशांना, उपलब्ध झालेली आहे. या सं.स्थळावर लिहिण्यासाठी तुम्हाला एक सांकेतिक नाव घ्यावे लागते. हे घेतले की त्या चर्चास्थानावर तुम्ही नवीन विषय चर्चेसाठी ठेवू शकता किंवा तिथे दुसर्‍या कोणी व्यक्तीने उपस्थित केलेल्या विषयाबद्दल मनमोकळेपणाने चर्चा करू शकता. या प्रकारच्या सं.स्थळांवर लेखन करणार्‍या व्यक्ती, या सांकेतिक नावाच्या किंवा टोपण नावाच्या बुरख्याच्या आत दडून आपले लेखन करत असल्याने जरा जास्तच मोकळेपणाने लिहित असतात असे दिसते. काहीतरी अतिशय विवादास्पद विषयावर धागा टाकायचा. त्यावर वाटेल तशी टीका टिपण्णी करावयाची व एकूण चर्चा आपल्या फार विरोधात जाते आहे असे लक्षात आले की गायब व्हायचे हा प्रकार करतानाही काही मंडळी आढळतात. अशा सांकेतिक किंवा टोपण नावाने हैदोस घालणे सभ्यतेला धरून कितपत आहे हेच बघण्याचा मी या लेखात प्रयत्न करतो आहे.
टोपण नावाने लेखन करण्याचा प्रकार काही नवीन नाही. 1930 च्या दशकात मालती बेडेकर (पूर्वाश्रमीच्या बाळूताई खरे) यांनी विभावरी शिरूरकर या टोपण नावाने केलेले लेखन सुप्रसिद्ध होते. काळाच्या बर्‍याच पुढे असणार्‍या व स्त्री जीवनाशी संबंधित अशा प्रश्नांवर त्यांनी केलेले ललित लेखन अतिशय गाजलेले होते. पुढे विभावरी शिरूरकर म्हणजे आपणच हे जेंव्हा त्यांनी प्रसिद्ध केले तेंव्हा टोपणनाव घेण्यातला आपला हेतू स्पष्ट केला होता. मराठी साहित्य, साहित्यिक यांच्यावर विनोदाच्या पांघरूणाखाली घणाघाती प्रहार करणारे ठणठणपाळ बर्‍याच जणांना आठवत असतील. सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी टीकाकार या भूमिकेतून लेखन करताना हे टोपण नाव घेतले होते.
मराठी कवींनी टोपणणाव घेण्याची तर मागच्या शतकात बहुदा फॅशनच होती. ग्रेस, कुसुमाग्रज, केशवसुत, बालकवी अशी अनेक उदाहरणे आहेत. आचार्य अत्र्यांसारख्या व्यक्तीलाही झेंडूची फुले हा विडंबनात्मक काव्यसंग्रह प्रसिद्ध करताना, केशवकुमार या टोपणनावाचा आधार घ्यावासा वाटला होता. हे सगळे कवी टोपणनावाने का लेखन करत असत? हे कोडे मला तरी उलगडलेले नाही. आपल्या नावाने लेखन करणारे भा.रा.तांबे, यशवंत किंवा ग.दि.माडगुळकर हे कवी किंवा इंदिरा संत, शांता शेळके, सरिता पत्की यासारख्या कवियित्री होत्याच मग नाटके मात्र शिरवाडकर नावाने लिहावयाची व कविता लिहिताना टोपण नाव घ्यायचे असे त्यांनी किंवा अगदी अलीकडच्या आरती प्रभूंसारख्या कवींनी बाकी लेखन करताना मात्र आपले खरे नाव चिं.व्य.खानोलकर का वापरले आहे ते खरोखरच कळत नाही. कदाचित खर्‍या नावाने कविता लेखन केल्यास आपले हृदय कसे फुलाप्रमाणे कोमल आहे यावर वाचकांचा विश्वास बसणार नाही असे त्यांना वाटत असावे.
ब्लॉग लिहिताना काही ब्लॉगर्स टोपण नावाने लिहितात पण ते बहुदा स्वत:चे नाव जगजाहीर करण्यास त्यांना वाटणार्‍या भिडस्तपणामुळे किंवा आपली पत्यक्ष आयुष्यातली ओळख व लेखक म्हणून एक ओळख या भिन्न असव्यात असे वाटत असल्याने तसे करतात असे मला वाटते. परंतु चर्चा संकेतस्थळावर एक किंवा अनेक टोपण नावांनी लेखन करणार्‍या तथाकथित लेखकांची मात्र मला पुष्कळ वेळा कीव कराविशी वाटते. खू.खू., वेडसर वासंती, पोळलेला पंप्या, किंवा सुंदर्‍या या सम नावे काही मंडळी का घेतात या मागचा हेतू बर्‍यापैकी पारदर्शक असतो असे वाटते. काही जणांना यात आपण मोठा विनोद करतो आहोत असे वाटत असते तर काही जणांना अवघड विषयांवर (लैंगिक संबंध) स्वत:च्या नावाने लेखन करणे किंवा सभ्यतेच्या खालच्या पातळीवर गेलेले लिखाण करणे या साठी हे टोपण नाव हवे असते. काही जणांना स्वत:ची खरी ओळख लपवायची असते. विवादास्पद लेखन करण्यासाठी तर अशी टोपणनावे उपयुक्त ठरतात. एखादा प्रश्न एका नावाने उपस्थित करावयाचा व दुसर्‍या नावाने त्या प्रश्नाच्या आधाराने इतर लेखकांवर टीका करावयाची असाही प्रकार काही जण करताना दिसतात. अशी टोपणनावे धारण केलेल्या व्यक्ती एखाद्या अत्यंत अनावश्यक किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या चर्चा धाग्यावर फालतू प्रतिसाद टाकून सं.स्थळावरील चर्चा हायजॅक करतानाही दिसतात.
परंतु हे सगळे प्रकार सौम्य पीडादायक आहेत असे नवीन काही ब्लॉग वाचल्यावर ध्यानात येते. निखालस खोटे, समाजातील आदरणीय किंवा मान्यताप्राप्त व्यक्तींवर अतिशय खालच्या दर्जाची टीका करणारे आणि जातीवर आधारित समाजकारण व ब्राम्हण विरोध हा हेतू असलेले लेखन प्रसिद्ध करणारे काही ब्लॉग्स अलीकडे दिसू लागले आहेत. असे ब्लॉग्स आपण कशी सत्याची कास धरून आहोत याचे सतत प्रतिपादन करताना दिसतात. एखादी नजर जरी या ब्लॉग्सवर टाकली तरी त्यांचे खरे स्वरूप लगेच ध्यानात येते. आंतरजालावर लिखाण करण्यास कोणतीही सेन्सॉरशिप किंवा नियंत्रण नसते त्याचा ही मंडळी प्रचंड गैरफायदा घेताना दिसतात
काही वेळा या टोपणधारी लेखकांचे लिखाण किंवा फोटो जालावरच्या दुसर्‍या कोणी उचलले तर त्यांना काहीच करता येत नाही कारण त्यांच्या टोपणनामुळे, हा आपला कॉपीराईट आहे असे सांगता येत नाही. मग असहाय्यपणे आपल्या लेखाची किंवा चित्राची चोरी झालेली बघत बसावी लागते. तसेच दुसर्‍या कोणी स्वत:बद्दल अपमानस्पद लिखाण केले तर बहुदा आपलेच भांडे फुटेल म्हणून या मंडळींना गप्पच रहावे लागते.
जालावरील मराठी लेखन अभिजात व सशक्त होण्यासाठी हे टोपणनामधारक लिखाण व ब्लॉग्स यांची संख्या कमी झाली पाहिजे असे मला वाटते. असे झाले नाही तर पीत पत्रकारितेच्या दिशेनेच जालावरील मराठी ब्लॉग्स व चर्चा वाटचाल करू लागतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.
11 जानेवारी 2011

No comments:

Post a Comment