
गेले 3 दिवस वर्तमानपत्रात येणार्या या बातम्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी दिल्लीला जे खेळाडू निवास बांधले आहे त्यासंबंधीच मुख्यत्वे आहेत. सिंगापूरचे 60/70 खेळाडू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याने तिथे असलेल्या परिस्थितीबद्दल साहजिकच सिंगापूरकरांना रस आहे व म्हणूनच या बातम्या येत आहेत. पण या बातम्या सिंगापूरपुरमधल्या माध्यमांच्यापुरत्याच मर्यादित आहेत असे समजण्याचे कारण नाही. मागच्या अनेक आठवड्यांच्यानंतर, BBC ला कश्मिरमधल्या दगड फेक्या लोकांच्या बद्दलच फक्त बातमी न देता भारताला कमी लेखण्याची दुसरी एक संधी या स्वच्छतागृहांमुळे मिळाली आहे यात शंकाच नाही.

परदेशातून येणारे विमान भारतातल्या कोणत्याही विमानतळावर उतरले की अनेक प्रवासी स्वच्छतागृहात प्रथम जात असतात. या प्रवाशांना भारतात पहिला दणका कोणता बसत असेल तर इथल्या स्वच्छतागृहांचा. कळाहीन दिसणारी वॉश बेसिन व कमोड सारखी भांडी, प्लेटिंग गेलेले नादुरुस्त नळ, घनरूप किंवा द्रवरूप साबण ठेवण्याची अस्वच्छ पद्धत, पेपर टॉवेल्सची एकूण व्यवस्था व पचपचीत ओली असलेली पायाखालची जमीन हे सर्व बघितले की भारतात येण्याच्या कोठून फंदात पडलो? असे या प्रवाशाला वाटल्याशिवाय राहत नाही. भारतीय प्रवासी मात्र या प्रवाशांसारखेच नाखुष होत असले तरी हा भारत आहे येथे असेच चालायचे असे समजून ते पुढे जातात. सिंगापूरच्या विमानतळावर मी एक मोठी अनुकरणीय गोष्ट बघितली आहे. तिथल्या प्रत्येक स्वच्छतागृहाच्या बाहेर त्या स्वच्छतागृहाला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा फोटो, माहिती व मोबाईल नंबर दिलेला मी पाहिला. बहुतेक ठिकाणी ही व्यक्ती त्या स्वच्छतागृहात सतत हजर असते व आपले स्वच्छतागृह स्वच्छ, चमकदार व वापरंण्यायोग्य कसे राहील व येणारे प्रवासी आनंदी कसे राहतील याची काळजी घेत असताना दिसते.
आपल्याकडच्या विमानतळावरच्या स्वच्छतागृहांची त्यातल्या त्यात बरी निगराणी होत असूनही त्यांची इतकी दयनीय अवस्था असते याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छतागृह स्वच्छ असले पाहिजे हे आपल्या संस्कृतीतच बहुदा नाही. घरातली खाजगी स्वच्छतागृहे सुद्धा इतकी घाणेरडी असतात तर कोणीच वाली नसलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे काय परिस्थितीत ठेवली जात असतील त्याची कल्पना सुद्धा करवत नाही.
मी लहान असताना माझे एक मामा मुंबईला गिरगावात चाळीत रहात असत. त्यांच्याकडे रहायला मला एक गोष्ट सोडली तर खूप आवडत असे व मजाही येत असे. तिथे रहाताना मला सर्वात किळस कसली येत असली तर तिथल्या स्वच्छतागृहांची. पाण्याचे नळ नसलेल्या त्या स्वच्छतागृहांची आठवण जरी झाली तरी अजून अंगावर काटा येतो. अर्थात त्याच्यापेक्षाही भयानक स्वच्छतागृहे मी बघितलेली आहेत. या स्वच्छतागृहात ठेवलेल्या टोपल्या, त्यांच्या आसपास फिरणारे डुकरांसारखे प्राणी व जमा झालेली घाण दुसर्या कोणीतरी व्यक्तीने येऊन घेऊन जाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कल्पना सुद्धा करता येणार नाही इतक्या गलिच्छ आता वाटतात.
कदाचित 200 वर्षांपूर्वी जगभरची स्वच्छतागृहे याच दर्जाची असण्याची शक्यता आहे पण इतर देशात जसजशा सामाजिक सुधारणा होत गेल्या तसतशी स्वच्छतागृहे ही जास्त स्वच्छ व वापरण्यास जास्त सुलभ होत गेली. भारतात मात्र या बाबतीत समाजात इतकी उदासीनता होती व आहे की आपल्याकडच्या स्वच्छातागृहात फारशी सुधारणा कधी झालीच नाही. माझ्या लहानपणी आमच्या घरातील स्वच्छतागृहे त्या काळातील पद्धतीप्रमाणे घराच्या बाहेर असत. एक व्यक्ती येऊन ती स्वछतागृहे रोज फिनाईल वगैरे टाकून साफ करत असे. आता अशी कोणी माणसेही मिळत नाहीत त्यामुळे स्वच्छतागृहे सफाईचे काम मुख्यत्वे स्वावलंबानेच करावे लागते. तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुसंख्य घरांच्यातली स्वच्छतागृहे फारशी स्वच्छ नसतातच. मध्यंतरी मी उत्तर हिंदुस्थानातल्या खेडेगावांच्या बद्दल एक बातमी वाचली होती. या बातमी प्रमाणे या खेड्यांच्यातल्या ज्या घरांच्यात स्वच्छतागृहे नाहीत अशा घरात आपली मुलगी द्यायलाच कोणी तयार होत नाही. ही बातमी सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने जरी स्वागतार्ह असली तरी खेड्यांच्यातल्या घरांच्यात अजूनही स्वच्छतागृहे नाहीत हे विदारक सत्य आपल्या समोर या बातमीमुळे येतेच आहे.
घराच्या आत जेंव्हा स्वच्छतागृह बांधले जाते तेंव्हा त्यात जुन्या पद्धतीचे भारतीय पॅन या प्रकारचे शौच गृह अजुनही बांधली जाते. या प्रकारच्या शौचगृहात टाकावे लागणारे पाणी व एकूण व्यवस्था यामुळे ही शौचगृहे घराच्या आतल्या बाजूस बांधण्यास अगदी अयोग्य आहेत असे मला वाटते. घराच्या अंतर्गत असणार्या स्वच्छतागृहांच्यात, पाश्चात्य कमोड या प्रकारची भांडी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने जास्त योग्य वाटतात. घरात स्वच्छतागृह बांधले तर जाते पण बहुसंख्य शहरांच्यात असलेल्या पाण्याच्या कमतरतेने ती स्वच्छ राखणेही कठिण जाते यात शंकाच नाही. कमी पाण्याचा वापर होऊन स्वच्छ राखता येतील अशी स्वच्छतागृहे भारतासाठी तयार केली जाण्याची खूप गरज आहे असे मला वाटते.
आपल्याकडची स्वच्छतागृहे स्वच्छ राहत नाहीत यासाठी निगराणी शिवाय आपल्या लोकांच्या बर्याचशा गलिच्छ सवईही कारणीभूत होतात असे मला वाटते. शौचगृहाचा वापर करताना सिगारेट ओढून राख व उरलेली सिगारेट तेथेच टाकणे, स्वच्छतागृहाच्या कोपर्यातच तंबाखूची पिंक टाकणे. पाण्याचा वापर करताना स्वच्छतागृहाची संपूर्ण जमीन ओली करणे या सारख्या आपल्या सवईंनी स्वच्छतागृहे घाणरेडी होतात व राहतात. आधी वापर केलेले स्वच्छतागृह जर पचपचीत ओले असले तर पुढच्या व्यक्तीला ते वापरणे किती किळसवाणे होत असेल त्याची कल्पनाच करणे बरे.
अर्थात राष्ट्रकुल स्पर्धेच्या खेळाडू निवासामधली स्वच्छतागृहे इतकी घाणेरडी असण्याचे कारण निराळेच आहे. 6 महिन्यांपूर्वी माझ्या पुण्यामधल्या घराच्या काही खोल्यांचे मी नूतनीकरण केले होते. त्यात स्वैपाकघरातील एकूण व्यवस्थाच मी बदलली. हे काम संपवून केंव्हा कामगार निघून गेले तेंव्हा ज्या परिस्थितीत ते स्वैपाकघर होते ते बघून मला अक्षरश: घाम फुटला होता. किचन सिंकमधे सिगरेटची थोटके, तंबाखूच्या पिंका, दगडमाती, गंजके स्क्रू व नट अशा अनेक गोष्टी सापडल्या. यामुळे सिंकमधे पाणी तुंबून रहात होते. या शिवाय बाकी स्वैपाकघरात कचरा, घाण यांचेच साम्राज्य होते. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या खेळाडू निवासाची ही अवस्था तिथे काम करणार्या कामगारांनी केली आहे यात शंकाच नाही. या कामगारांच्या आरोग्य विषयक सवई आदिमानवाच्या काळातल्या असल्याने हे घडले आहे.
काम पूर्ण होण्याच्या वेळी हे सगळे असेच असणार आहे याची खरे म्हणजे सर्व कंत्राटदारांना आणि व्यवस्थापन समितीला पूर्ण कल्पना असणार. तरीही वेळेत दुसरी माणसे नेमून ही वसतीगृहे स्वच्छ व चकचकीत दिसतील याची काळजी त्यांनी घेतली नाही हे त्यांचे फार मोठे अपयश आहे. या अपयशामुळे भारतात व परदेशात रहाणार्या प्रत्येक भारतीयाची मान लाजेने खाली गेली असणार आहे याबद्दल माझी खात्री आहे. एकदा हे खेळ संपले ही या अनागोंदी कारभाराबद्दल जबाबदार व्यक्तींना योग्य शासन मिळेल एवढीच आशा आपण करू शकतो.
24 सप्टेंबर 2010
No comments:
Post a Comment