Friday, December 23, 2011

Chilled Pune, just for me


Quantcast
I returned back to Pune after a long period of three and half months. When we entered Pune, the clock showed 9.30 in the morning. By Singapore standards it should have been very hot and murderously sunny. I was pleasantly surprised to experience cooler air. In Singapore, such coolness is possible only in air conditioned buildings. It was a great experience to feel such cool and crisp air. Even in Pune, weather has changed now. It is rather rare, when we can experience such beautiful weather. I recollect that in the previous year, we had such fine weather only couple of times. The sky would turn cloudy, whenever mercury started going down, and hot air would return. This year surprisingly, things have turned for better. There were three days last week, when sky was cloudy. Even then the weather stayed cool with even colder winds blowing from the north. Punaites brought out their woolens to enjoy the weather. In reality the night temperatures were not very much lower, but days were cooler and the weather became very enjoyable.  मागच्या आठवड्यात, तब्बल साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर पुण्यामधे परत पाऊल ठेवले. माझी गाडी पुण्यात शिरली तेंव्हा सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते. सिंगापूरच्या स्टॅन्डर्ड प्रमाणे एव्हाना उन्हाचे चटके बसणे अपेक्षित होते. गाडीतून उतरताना प्रथम जाणवला तो एक सुखद गारवा. सिंगापूरमधे गारवा ही चीज फक्त वातानुकूलित कक्षांमध्ये अनुभवायला मिळते त्यामुळे प्रथम काही क्षण लक्षातच आले नाही की अरे! पुण्यात चक्क थंडी पडली आहे. अलीकडे पुण्यात सुद्धा थंडी क्वचितच पडते. मागच्या वर्षी तर एक किंवा दोनच दिवस थंडी पडली होती. जरा गार होते आहे असे वाटू लागले की पावसाळी ढग येत व परत उकडू लागे.
या वर्षी मात्र हा अगदी सुखद असा बदल जाणवतो आहे. मधे 3 दिवस आकाश ढगाळच होते पण थंडी मागच्या वर्षी सारखी पळून गेली नाही. उलट गार गार वारे सुटले आणि समस्त पुणेकरांचे उबदार कपडे कपाटाच्या बाहेर आले. प्रत्यक्षात रात्रीचे तपमान फारसे खाली गेलेले नव्हते परंतु दिवसाचे तपमान मात्र एकदम उतरले व हवा एकदम मस्तच होऊन गेली.
अशी थंडी पडली की माझे मन एकदम भूतकाळातच जाते. शाळा कॉलेजमधले दिवस आठवतात. त्या वेळेला (सुमारे 50 तरी वर्षांपूर्वी) नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला की थंडीची चाहूल लागत असे. कॉलेजमधले एक्स्ट्रॉ तास किंवा शाळेतल्या NCCच्या परेड्स या थंडीच्या दिवसात लवकर सकाळी ठेवल्याच पाहिजेत असा त्या काळी बहुदा नियम असावा. कारण आठवड्यात 3/4 दिवस तरी सकाळी काहीतरी कार्यक्रम असेच. म्हणजे सकाळी लवकर उठणे क्रमप्राप्त होत असे. अलीकडे पहाटेचे 5 वाजले की जागच येते व कधी एकदा अंथरूण सोडतो असे होतो. त्या काळात सकाळी साडेसहाला उबदार पांघरूण सोडून बाहेर गार हवेत कुडकुडत सायकल मारण्याची कल्पना सुद्धा अघोरी वाटत असे पण इलाज नसल्याने बाहेर पडावेच लागे. आमच्या शाळेतली अनेक मुले तेवढ्या थंडीत सुद्धा नुसता एक पातळ सदरा घालून येत. अलीकडे शाळेत जाणार्‍या मुलांच्या अंगावर मी निळा किंवा लाल पूर्ण बाह्यांचा स्वेटर बघतो. तो स्वेटर मुलांना म्हणे युनिफॉर्म म्हणूनच मिळतो. मी शाळेत असताना युनिफॉर्म म्हणजे पांढरा हाफ शर्ट व खाकी चड्डी एवढाच असे. हा युनिफॉर्म शिवणे सुद्धा बर्‍याच पालकांना जड जात असे. त्यामुळे युनिफॉर्मचा भाग म्हणून बूट किंवा कॅनव्हासचे स्पोर्ट्स शूज, स्वेटर वगैरे चैन तेंव्हा शक्यच नव्हती. बहुतेक मुले चपला घालूनच येत. आमच्या वर्गातली अनेक मुले एवढ्या थंडीत स्वेटर न घालता तर येत असतच पण आपल्याला कशी थंडी वाजत नाही हे ते मोठ्या प्रौढीने सांगत. एखादा मुलगा शाळेत स्वेटर घालून येतो म्हणजे तो मुलींसारखा नाजुक आहे असे समजण्यात येत असे. मी घरातून बाहेर पडायचो तेंव्हा स्वेटर घातला आहे की नाही हे माझी आई कटाक्षाने बघत असे. मग कोपर्‍यावर घर नजरेआड झाले की मी हळूच स्वेटर काढून दप्तरात ठेवून देत असे. शाळेत गेल्यावर अंगावर स्वेटर दिसला तर इतर मुलांना चिडवायला आपण आयतेच सावज होऊ ही भिती मनात असेच. जवळ स्वेटर असून, थंडीत कुडकुड्णारी आम्हीच मुले होतो असे नाही. तेंव्हा ती फॅशनच होती. अलीकडे संध्याकाळी, सकाळी थंडीत बाहेर पडले तर निरनिराळ्या रंगांचे स्वेटर्स, शाली, जॅकेट्स, जर्किन्स यांचे एक प्रदर्शनच बघायला मिळते. त्या वेळेस, आयते स्वेटर सहसा कोणी वापरत नसे. घरात कोणाला न कोणाला तरी विणकामाची आवड असल्याने, विणलेले स्वेटर्स घालण्याचीच प्रथा होती. जॅकेट्स, जर्किन्स वगैरे तर क्वचितच बघायला मिळत.
मी कॉलेजमधे असताना एकदा माझ्या वडिलांच्या मोटर सायकलचा पेट्रोलचा पाईप फुटला व त्यातून वाहणार्‍या पेट्रोलने अचानक पेट घेतला व मोठा जाळ झाला. मी प्रसंगावधान राखून एक फायर एस्टिंगविशर जवळ होता तो वापरून ती आग विझवली होती. माझ्यामुळे मोटर-सायकल वाचली असे घरात ठरले व मला बक्षिस म्हणून काय पाहिजे? अशी विचारणा झालेली मला आठवते. तेंव्हा मी ताबडतोब मला जर्किन हवा म्हणून माझी मागणी नोंदवलेली मला आठवते. मग कॅम्पातल्या मेन स्ट्रीटवर जाऊन एका शिंप्याकडून मी एक जर्किन शिवून घेतला होता. तो जर्किन मला एवढा आवडत असे की अगदी फाटेपर्यंत मी तो वापरला होता त्याचा तो हिरवट काळसर रंग मला अजून आठवतो. .
आमच्या शाळेच्या दरवाजाबाहेरच एक अमृततुल्य चहाचे दुकान असे. तिथला वाफाळणारा गरम चहा व पिळाची खारी बिस्किटे तोंडाला अगदी पाणी आणत. परंतु तेंव्हा पॉकेट मनी वगैरे प्रथा नसल्याने बहुतेक कोणाजवळ पैसे वगैरे नसतच. त्यामुळे इतर चहा पिणार्‍या मंडळींच्याकडे बघूनच समाधान मानावे लागे. एखाद वेळेस चुकून एखाद दुसरा आणा खिशात असला तर दोघे तिघे मिळून त्या चहाचा आस्वाद घेत असू. त्या घोटभर चहाची चव मात्र अजुन माझ्या जीभेवर रेंगाळत असते. आता कितीही महागातली चहाची पावडर आणली तरी तसा चहा परत आयुष्यात कधीच प्यायला मिळाला नाही हे ही खरेच आहे.
थंडी पडली की काही खास पदार्थ माझी आई बनवत असे. लसणीची फोडणी घातलेले खमंग मेथीचे पिठले, कांदा बटाट्याचा झणझणीत रस्सा व तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे थंडी स्पेशल पदार्थ असत. या सगळ्या बरोबर लसणीची लालभडक चटणी ही असेच. बाजरीची भाकरी उष्ण असते म्हणून ती थंडीतच खायची हे इतके माझ्या डोक्यात बसलेले आहे की आता कधी कुठे बाजरीची भाकरी दिसली तर आता कशी काय बुवा ही बनवली असे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर लगेच उभे रहाते.
पुढे कॉलेजात गेल्यावर डिसेंबरच्या सुट्टीत NCC चा कॅम्प भरत असे. भर थंडीच्या दिवसात पहाटे परेड करायला धमाल यायची. त्यानंतर मेस म्हणून उभारलेल्या राहुटीमधून एका रांगेत उभे राहून खाद्य पदार्थ आपल्या डिशमधे घ्यायचे हे तिथे मी पहिल्यांदा अनुभवले. अलीकडे पॉश हॉटेलांच्यात बफे डिनर घेताना मला त्या NCC डिनर्सची आठवणे होते. या NCC कॅम्प्स मधल्या जेवणांच्यात मी आयुष्यात प्रथम मटन व चिकन हे खाद्यपदार्थ चाखून बघितले होते.
त्या वेळी थंडीच्या दिवसात पुण्याच्या डोक्यावरचे आकाश निरभ्र झाले की तारे बघायला मजा येत असे. बहुतेक तेजस्वी नक्षत्रे या कालातच आकाशात चमचमतात. उन्हाळ्यात दिसणारे तारे मंद प्रतीचे असल्याने तारे बघायला एवढी खास मजा येत नसे. माझ्या आजोबांना ज्योतिर्विद्याशास्त्राची आवड असल्याने त्यांना दिसणारे तारे कोणते आहेत हे माहिती होते. त्यांच्याकडून तार्‍यांची माहिती समजावत कित्येक संध्याकाळी मी घराच्या गच्चीवर घालवल्या आहेत.
थंडीचे दिवस सुरू झाले की घराच्या जवळ असलेल्या टेकड्यांवर फिरायला जाण्याचे आम्हा मित्रमंडळींचे बेत ठरत अगदी चार साडेचारला घरातून निघाले तरी चालत असे. त्या फिरण्यामधल्या गप्पा अजुनही माझ्या स्मरणात आहेत.
त्या दिवसांतल्या थंडीची मजा आता काही येत नाही हे मात्र खरे. एकतर प्रदुषण, गर्दी यामुळे पुण्याचे हवामान बिघडून तर गेले आहेच. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते वयही गेले आहे. अमुक केले तर सर्दी होईल. तमुक केले तर खोकला होईल अशी भिती तुम्हाला एकदा वाटू लागली की साध्या साध्या गोष्टींच्यातून जो आनंद, जी मजा पूर्वी मिळत असे तो आता तसा मिळतच नाही.
पण ती मजा जरी आता लुटता येत नसली तरी पूर्व स्मृतींना उजाळा देऊन पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवणे हे तर माझ्या हातातच आहे. तो माझा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही मग तक्रार तरी कसली करायची? हे ही खरेच.
14 डिसेंबर 2010

2 comments:

  1. आपल्या या आजच्या लेखातील सारे काही मनापासून लिहिलेले आहे असे जाणवते. शेवटचा परिच्छेद हा त्यावरील कळस आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद ही काही आपली अशी खास चीज असते. हा आनंद आपण स्वतःबरोबर वाचकांना देत आहात, हे किती मोठे सुख आहे. धन्यवाद.

    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  2. मनब -

    प्रतिसादासाठी धन्यवाद

    ReplyDelete