Thursday, December 1, 2011

Me, a wanderer

Quantcast
I have been rather unusually busy for last few days because I need to finish many essential jobs like visiting banks, running small errands, at a shot and that also within next few days. This is a must as I have to leave for my yearly sojourn abroad. Sometimes I feel like a migratory bird, which must leave for the south as the winter sets in. A better comparison may be to the British Viceroy of India, who always changed his place of office every summer to Shimala. I have been doing this yearly migration for last eleven years. Luckily, I do not have to leave the shores of India on a specific date or a specific season. Unlike the migratory birds or the Viceroy,  I am free to decide the dates of leaving and coming back depending where I am needed more. When my outbound travel date is fixed, my grandchildren abroad are thrilled and happy, whereas my grandchildren in India, whom I would be leaving behind for few months are not so pleased. When I come back, what happens is just exactly in reverse. This always brings certain kind of inertia in me and I do not feel like leaving the place, where I am staying.This migration has become such a part of my routine now that within a day or two, I am back to my daily routine in a new country. Still the unhappiness of the kids, whom I am leaving behind does make me somewhat reluctant to go on travel.
  गेले चार पाच दिवस मी जरा व्यस्तच आहे. अनेक बारीकसारीक कामे, बॅन्कांना भेटी वगैरे सारख्या केल्याच पाहिजेत अशा या बाबी एकदम व चार पाच दिवसातच मला संपवणे आवश्यक होते कारण मला आता माझ्या वार्षिक परदेश भेटीला जाण्यासाठी निघायचेच आहे. हिवाळ्यात पक्षी जसे स्थलांतरण करतात किंवा स्वातंत्र्यपूर्व कालात भारतातला व्हॉईसरॉय जसा दर उन्हाळ्यात शिमल्याला जायला निघत असे तसाच काहीसा प्रकार मी गेली अकरा वर्षे करतो आहे. अर्थात हे पक्षीगण किंवा व्हॉईसरॉय साहेब, यांच्यासारखा माझ्या जाण्याचा काल काही निश्चित नाही. मनाला वाटेल तेंव्हा आणि गरज असेल त्याप्रमाणे, माझ्या जाण्यायेण्याच्या वेळा ठरतात. जाण्याची तारीख ठरली की तिकडची नातवंडे खुश होतात तर पुण्यातली नातवंडे हिरमुसतात. परत यायच्या वेळी बरोबर उलटे घडते. त्यामुळे जावेसे पण वाटते आणि जाऊ नये असेही वाटत राहते. हे सगळे आता इतके आंगवळणी पडल्यासारखे झाले आहे की तिकडे पोचले की दुसर्‍या किंवा फार तर तिसर्‍या दिवशी माझे रूटीन परत चालू होते. तरी सुद्धा जाता येताना कंटाळवाणे हे होतेच.
गेल्या दहा वर्षात, एकूणच या परदेश प्रवासाबद्दल एवढे बदल सगळ्या व्यवस्थेत आणि लोकांच्या मानसिकतेत झाले आहेत की ते प्रकर्षाने लक्षात आल्याशिवाय रहात नाहीत. दहा वर्षांपूर्वी तशी परदेशी जाणार्‍या लोकांची संख्या कमीच असे आणि तो प्रवास करण्यासाठी सामान्य माणसांना बर्‍याच अडचणीही येत असत. त्यामुळे परदेश प्रवासाला एक ग्लॅमर होते. आता एकतर परदेश प्रवास तसा इतका कॉमन झाला आहे की तुमच्या परिचितांना, तुम्ही शिकागोला जात असा किंवा शिखर शिंगणापूरला, सोयरसुतक असे फारसे नसतेच. आता अगदी मध्यमवर्गीय बायकांचे गट सुद्धा जितक्या सहजतेने मड आयलंडला पिकनिकला जावे त्याच सहजतेने लंकावी किंवा फुकेट ला वीक एन्ड घालवण्यासाठी जात असतात. त्यामुळे परदेश प्रवासाला आता ग्लॅमर असे उरलेलेच नाही.
दहा वर्षांपूर्वी परदेशी जायचे म्हणजे बर्‍याच आधीपासून तयारी सुरू करायला लागत असे. पासपोर्ट, व्हिसा या औपचारिकता पूर्ण करण्यातच एवढा शीण येत असे की प्रवासाला निघण्याच्या आधीच गळून जायला होत असे. परदेशात तुम्ही जरी आपल्या मुलांच्याकडे राहणार असलात तरी थोडेफार परदेशी चलन घेऊन जावेच लागते. ते मिळवणे हा एक मोठा सोपस्कार असे. आता ते सुद्धा इतके सोपे झाले आहे. त्या वेळी परदेशातील जीवनमान व भारतातले जीबनमान यात एवढा मोठा फरक जाणवत असे की नुसत्या सामानाकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी भारतीय प्रवासी लगेच ओळखून येत असे. मला नेहमी वाटायचे की भारतीय प्रवासी परदेशात अगदी लाजिरवाणे वर्तन करतात. परंतु मध्यंतरी एका पाहणीचे निदान मी वाचले. त्याप्रमाणे भारतीय प्रवाशांचे वर्तन इतर काही देशांच्या प्रवाशांपेक्षा बरेच चांगले आहे.
परदेशी जाण्याचा विमान प्रवास एक परवडला पण दहा वर्षाँपूर्वी, त्या साठी करावा लागणारा पुणे-मुंबई प्रवास नकोसा वाटे. त्या वेळी एक्सप्रेस हायवे नव्हता. त्यामुळे मोटर गाडीने मुंबईला जाणे म्हणजे बेभरवशाचे काम असे. त्यामुळे मध्यरात्रीची फ्लाईट घेण्यासाठी पुण्याहून सकाळच्या ट्रेनने निघायला लागायचे. म्हणजे एवढे सगळे सामान उरापोटी घेऊन मुंबईला कोणाकडे तरी जायचे. दिवसभर वाट बघण्यात घालवायचा व पुढे जागरण करावयाचे. अगदी नकोसे होई.
विमान तळावर गेल्यावर सुद्धा सामान ठेवायला ट्रॉलीज लवकर मिळत नसत. त्या शोधणे तिथल्या गर्दीत आपला चेक इन काऊंटर शोधणे हे सगळे प्रकार दमवून टाकत. आजच्या सारखे ई-तिकीट, इंटरनेट चेक-इन वगैरे सुविधा त्या वेळी नसल्याने उगीचच मनावर ताण येत असे. त्यामुळे विमानात बसल्यावर इतके हायसे वाटायचे की आता कल्पनाच करता येणार नाही.
त्या वेळी भारतातून जातानाही बॅगा ठासून भरलेल्या असत. कारण मुलांसाठी, नातवंडांसाठी, लोणची, पापड या पासून ते कपड्यांपर्यंत वस्तू खरेदी केलेल्या असत. आताही त्या तशाच भरलेल्या असतात. मात्र त्या वेळी परत येतानाही बॅगा तिथल्या खरेदीने ओतप्रोत भरलेल्या असत. आता खरेदी कशासाठी आणि कोणासाठी करायची असा प्रश्न समोर असल्याने फारशी काही खरेदी होत नाही व बॅगा फारशा भरतच नाहीत. जर आणखी दोन पाच वर्षे मी ही परदेश वारी अशीच चालू ठेवली तर त्या वेळी परत येताना बॅगा बहुदा रिकाम्याच असतील असे मला आता वाटू लागले आहे. कारण परदेशातल्या मॉलमधे ज्या वस्तू असतात त्याच आपल्याकडे दिसतात. पूर्वी आपल्याकडे चांगले वॉकिंग शूज मिळत नसत. त्यामुळे ते खरेदी करणे हा दरवर्षीचा एक ठरलेला कार्यक्रम असे. आता त्याची काहीच गरज भासत नाही कारण आपल्याकडे तसेच शूज मिळतात. त्यामुळे त्या एका खरेदीची सुद्धा आवश्यकता उरलेली नाही.
लेख आता आवरता घेतला पाहिजे. अजून थोडी फार आवर आटप करणे बाकी आहे. भेटूच पुढच्या लेखात पण आता नव्या देशातून. त्यामुळे नवे विषय पण मिळतील.
24 ऑगस्ट 2010

No comments:

Post a Comment