Friday, December 9, 2011

No. 64, Govardhan Dham Colony

'Govardhana Dham' is a posh residential colony in the Indian city of Ujjain,( State of Madhya Pradesh). This colony is listed as a show piece in the city development plans of the local municipality. The colony consists of nicely built houses and just a look around would convince any onlooker, that fairly well to do and wealthy citizens of Ujjain city are inhabitants of this colony. Some of the residents of this colony turned out to be very lucky few days back, when suddenly currency note bundles and jewellery, started raining on their houses and the terraces. However their luck lasted only for a short while.
मध्य प्रदेशातल्या उज्जैन या शहरात गोवर्धन धाम कॉलनी म्हणून एक वसाहत आहे. शहर सुधारणेचा एक भाग म्हणून ही व या पद्धतीच्या इतर काही कॉलनी इथल्या नगरपालिकेने विकसित केल्याचे शहर सुधारणा योजनेच्या परिपत्रकात म्हटलेले आहे. या कॉलनी मध्ये चांगली टुमदार घरे आहेत व घरांच्या एकूण रचनेवरून सुखवस्तू मंडळी येथे रहात असावीत अशीच कोणाचेही कल्पना व्हावी. या गोवर्धन धाम कॉलनीमधल्या काही रहिवाशांना दोन दिवसापूर्वी अचानक धनलाभ झाला. निदान थोड्या कालासाठी तरी त्यांना तसे भासले. त्यांच्या शेजारच्या एका घराच्या गच्चीतून त्यांच्या घरावर आणि घराच्या गच्चीवर अचानक नोटांची बंडले आणि इतर दागदागिने यांचा वर्षाव शेजारच्या एका घरातून सुरू झाला.

ज्या घराच्या गच्चीतून हा अचानक धनवर्षाव सुरू झाला होता ते, म्हणजे क्रमांक 64- गोवर्धन धाम कॉलनी, या ठिकाणी असलेले घर, उज्जैन नगरपालिकेत प्यून व स्टोअरकीपर या हुद्यावर असलेले एक चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी व 53 वर्षे वय असलेले श्री. नरेन्द्र देशमुख यांच्या मालकीचे होते.
हा धनवर्षाव सुरू झाल्याने साहजिकच गडबडून हे रहिवासी घराबाहेर आले तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की मध्य प्रदेश लोकायुक्तांच्या पोलिसांनी या घरावर धाड टाकली आहे व त्यामुळे घरातील लोक हे पैसे फेकून देत आहेत. या पोलिसांनी जेंव्हा घराच्या दरवाजावर थापा मारल्या तेंव्हा प्रथम देशमुखांनी 20 मिनिटे दारच उघडले नाही व पैसे व दाग दागिने गच्चीतून फेकून देण्यास सुरूवात केली. मात्र पोलिसांनी फेकून दिलेले पैसे व इतर वस्तू जमा केल्या व श्री देशमुख यांना ताब्यात घेतले. श्री. देशमुख 1980 मध्ये उज्जैन नगरपालिकेत प्यून म्हणून कामाला लागले. तेंव्हा त्यांचा पगार फक्त 150 रुपये होता. आज 31 वर्षांनंतर ते अजूनही प्यून या पदावरच आहेत कारण नगरपालिकेतील उघडकीस आलेल्या जवळजवळ प्रत्येक घोटाळा किंवा अफरातफरी यात त्यांचा हात असल्याचे आढळून आल्याने त्यांना पदोन्नती कधीच मिळू शकली नाही. या 31 वर्षांच्या कालावधीत देशमुख यांना एकूण 15 लाख रुपये पगार मिळाला असल्याने 6 लाखापेक्षा जास्त बचत ते करूच शकत नाहीत असे लोकायुक्त पोलिसांचे म्हणणे आहे.
मात्र प्रत्यक्षात त्यांची धनदौलत 10 कोटी रुपयाच्या आसपास असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या मालकीची दोन घरे आहेत. या शिवाय 18 एकर क्षेत्रफळाचा पोल्ट्री फार्म, 13 एकरची शेती, चिकन शॉप, निरनिराळा बॅंक खात्यात 13 लाख रुपये, महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील 5 एकर शेती, हरयाणा राज्यात आणि मुंबई मधे असलेली प्रॉपर्टी. दोन एसयूव्ही गाड्या, दागदागिने हे ही या नरेन्द्र देशमुखांच्या मालकीचे आहेत.
देशमुखांच्या घरात 6 लॅपटॉप संगणक, 10 मोबाईल फोन व इतर अनेक अत्यंत महाग अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू पोलिसांना आढळून आल्या. त्यांची 10 बॅंकांच्यात खाती आहेत व 4 आलीशान गाड्याही त्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या बॅंक खात्यांचे व्यवहार तपासले असताना अनेक कोटी रूपयांचे व्यवहार या खात्यांतून झालेले आढळून आले आहेत. उज्जैनच्या गोवर्धन धाम कॉलनीमधल्या त्यांच्या घराची किंमतच 50 लाख रुपये तरी आहे. आपल्या भावाबरोबर गुडगाव मध्ये भागीदारीत त्यांचे एक हॉटेल आहे तर मुंबईत एक कारखाना आहे. त्यांची राहती दोन्ही घरे त्यांच्या पत्नीच्या नावावर केलेली आहेत.

नरेन्द्र देशमुख यांची एकूण कामगिरी बघून आपण काहीतरी सुरस व चमत्कारिक कथा वाचतो आहोत असेच वाटू लागते. नगरपालिकेत चतुर्थ श्रेणीतील प्यून असलेल्या व ज्याला कधीही पदोन्नती सुद्धा मिळू शकली नाही अशा माणसाजवळ एवढी माया असू शकते हे दिसल्यावर ते ज्या देशाचे नागरिक आहेत त्या भारताला गरीब देश कोण म्हणणार?
9 डिसेंबर 2011

2 comments:

  1. हा 'चमत्कार' काही एका दिवसात घडत नाही. कोणालातरी पुरेसा हप्ता पोचला नसल्याने ही कारवाई झाली असण्याची शक्यता जास्त .. ती गुपचूप मिटली जाईलही ...

    ReplyDelete
  2. अतिवास-

    तुम्ही म्हणता तसे घडण्याची शक्यता जास्त वाटते.

    ReplyDelete