Friday, December 16, 2011

Run for your lives - Part III

Quantcast From the tri junction point, where eastern border of India, Tibet and Bhutan meet, a range of hills known as Thagla Ridge, spread towards southeast. Near the  eastern end of this ridge is a confluence of  two rivers. The southwards  flowing Namka Chu river  meets here west-east flowing Nyamjang river. From this pint, this river flows southwards and  crosses India-Tibet border and flows into India along the Bhutan border and villages of Lumpu and Shakti and eventually meets east-west flowing Gomkang Chu river first and the Tawang Chu river. Shakti village mentioned above is located roughly to west of district town of Tawang.  The main road from Shakti village to Tawang, passes through Lum La pass.
On 23rd October 1962, Chinese soldiers crossed  Macmohan line international border and with rapid advances reached Lumpu and Shakti villages. 
भारताची ईशान्य सीमा, चीन व भूतान या देशांच्या सीमांना, ज्या ट्राय जंक्शन पॉइंटपाशी येऊन मिळते तेथून साधारण अग्नेयेकडे, थागला रिजच्या टेकड्यांची रांग आहे. या रिजच्या दक्षिण बाजूला वहाणारी नामका चू ही नदी व पूर्वेकडून वाहणारी न्यामजान्ग चू ही नदी या रिजच्या टोकाजवळ एकमेकाला मिळतात. या नंतर न्यामजान्ग नदीचा प्रवाह उत्तर दक्षिण असा वहात असल्याने ही नदी यानंतर भारताची सीमा ओलांडते व भूतानच्या सीमेच्या अगदी जवळूनच लुम्पु व शक्ती या गावांच्या जवळून दक्षिणेकडे वाहत जाते व गोमकांग रॉन्ग चू या पूर्व पश्चिम वाहणार्‍या नदीला प्रथम व नंतर तावान्ग चू या नदीला जाऊन मिळते. या नदीवर असलेले शक्ती हे गाव तावांग गावाच्या साधारण पश्चिमेला येते. शक्ती गावापासून लम ला या खिंडीमधून तावान्ग गावाकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे.23 ऑक्टोबर 1962 या दिवशी प्रथम चिनी सैन्याने या नदीजवळच मॅकमोहन रेषा पार केली व अतिशय झपाट्याने हे सैन्य प्रथम लुम्पु व नंतर शक्ती या गावांच्यापर्यंत येऊन पोहोचले.
तावान्ग हे गाव NEFA मधले अतिशय महत्वाचे गाव मानले जाते. ऑक्टोबर 1962 मधे, या ठिकाणी 4 Arty, 4 Infantry व 22 Mountain regiment या भारतीया सैन्य तुकड्यांची मुख्यालये होती. चिनी सीमेवरच्या बम ला व त्याच्या पूर्वेला असलेली ट्य़ुटलिंग ला या दोन खिंडी तावान्ग गावाच्या सर्वात जवळ असल्याने (26 किलोमीटर) या खिंडींच्यातून चिनी आक्रमणाची शक्यता लक्षात घेऊनच तावान्गच्या संरक्षणाचा सर्व आराखडा आधारलेला होता. या खिंडींच्या कडे जाणार्‍या रस्त्यांच्यावर भारतीय सैन्याच्या तुकड्या खंदकात तैनात केलेल्या होत्या. न्यामजान्ग चू नदीच्या खोर्‍यातून चिनी सैन्य वेगाने पुढे येते आहे हे लक्षात आल्याबरोबर तावान्ग गावाचे संरक्षण कसे करावयाचे हा मोठा गहन प्रश्न या भागातील सेनाधिकार्‍यांच्या समोर येऊन उभा राहिला.

आसाम मधल्या तेजपूर शहरापासून तावान्ग कडे जाण्यासाठी फक्त एकच रस्ता उपलब्ध होता. हा रस्ता बोमडी ला वरून डिरान्ग गावाजवळून से ला खिंडीत पोचत होता. या खिंडीच्यापुढे, जान्ग गावाजवळ असलेल्या तावान्ग चू नदीवरचा पूल पार करून हा रस्ता तावान्ग पर्यंत पोहोचत होता. हलकी (1 टन) मालवाहू वहाने जान्ग गावापर्यंत कशीबशी जाऊ शकत होती. या नंतर सर्व माल वाहतुक खेचर किंवा घोडे यावरूनच करावी लागत होती. तावान्ग गावाच्या पूर्वेला असलेल्या एका पायवाटेने जर चिनी सैन्य आत घुसले असते तर ते जान्ग गावाजवळ तावान्ग चू नदीच्या दक्षिण काठावर पोचले असते व त्यांना जान्ग जवळचा पूल उध्वस्त करणे सहज शक्य होते. असे झाल्यास तावान्ग व त्याच्या उत्तरेला असलेले सर्व भारतीय सैन्य पूर्णपणे अडकून पडले असते व त्यांना रसद पुरवणे अशक्य झाले असते.
तावान्ग मधल्या भारतीय सेनेचे नेतृत्व करणारे मेजर जनरल निरंजन प्रसाद यांनी लेफ्टनंट जनरल एल.पी.सिंग यांच्याशी सल्ला मसलत करून या संबंध युद्धातला सर्वात विवादास्पद समजला जाणारा असा एक निर्णय या वेळी घेतला. 23 ऑक्टोबरला घेतलेल्या या निर्णयानुसार, तावान्ग व त्याच्या उत्तरेला असणार्‍या सर्व सेनांना, जान्गच्या पुलाच्या दक्षिणेला माघार घेण्यास सांगण्यात आले. त्यांचा हा निर्णय अनेक सेनाधिकार्‍यांना मान्य नव्हता कारण तावान्गमधल्या सैन्याकडे शिधा सामुग्री व्यवस्थित होती व त्यांना तावान्ग व्यवस्थितपणे लढवता आले असते. जान्गच्या पुलापर्यंत ट्रक जाऊ शकतील असा रस्ता असल्याने जरी हा पूल चिनी सैन्याने पाडला असता तरी भारतीय सैन्य तो परत बांधू शकत होते.माघारीच्या या निर्णयाने भारतीय सैनिकांचे धैर्य तर खचलेच आणि तावान्ग व त्याच्या उत्तरेला असलेला सर्व भाग चिनी सैन्याला एक गोळीही न झाडता ताब्यात घेता आला.


24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भारतीय सेना या पुलाच्या दक्षिणेकडे उतरल्या व हा पूल उडवून देण्यात आला. यानंतर सतत चढाई करणारे चिनी सैन्य आपली स्थिती मजबूत करण्यासाठी 3 आठवडे आहे त्याच स्थानांच्यावर थबकले. भारतीय सेनेच्या बाजूला मात्र या कालात संपूर्ण गोंधळ, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. सैन्याच्या नवीन तुकड्या देशातून सतत येत होत्या. त्यांची शस्त्रसामुग्री त्यांच्यपर्यंत पोचत नव्हती. आलेल्या सैनिकांनी कोठे मोर्चे बांधायचे याचे निर्णय सारखे फिरवले जात होते. ट्रक्स मिळत नसल्याने सैनिकांना त्यांचे सामान मिळत नव्हते. या सर्व प्रकाराचे वर्णन भारत सरकारच्या अधिकृत अहवालात वाचायला मिळते व ते वाचून कोणाचीही मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहणार नाही.
से ला खिंड लढवण्याचा मूळ निर्णय आता बदलण्यात आला व से ला खिंडीच्या दक्षिणेला असलेल्या डिरान्ग गावाजवळच्या डिरान्ग चू नदीच्या काठावर भारतीय सेनेने आपली मोर्चे बांधणी केली. अर्थात से ला पासून जान्ग पर्यंतच्या रस्त्यावर भारतीय तुकड्यांचे मोर्चे होतेच. 16 नोव्हेंबरला युद्धाला परत तोंड फुटले. या वेळेपर्यंत जान्ग नदीवरचा पूल चिनी सैन्याने दुरूस्त केला होता मात्र चढाई करणारे चिनी सैन्य फक्त से ला खिंडीच्या या रस्त्याने न येता दोन्ही बगलांनी सुद्धा चढाई करू लागले. 17 आणि 18 नोव्हेंबरला परिस्थिती काय होती हे सांगणे अशक्य आहे कारण भारतीय सैन्यातील परिस्थिती संपूर्ण गोंधळाची होती. सेनाधिकारी संपूर्णपणे विरोधी आज्ञा देत होते. या युद्धानंतर घेतलेल्या आढाव्यात असे दिसते की कोणालाच काय होते आहे हे कळत नव्हते. मेजर जनरल बी.एम.कौल यांनी भारतीय सैन्याची सगळीकडे होत असलेली पीछेहाट पाहून शेवटी 18 नोव्हेंबरलाम भारतीय सेनेला बोमडी ला च्या दक्षिणेपर्यंत माघार घेण्याची ऑर्डर काढली. या सर्व गोंधळाच्या काळात भारतीय सैनिक व तुकड्या मात्र अतिशय शौर्याने व धैर्याने आपल्या प्राणाची तमा न करता लढत राहील्या. परंतु या अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीत या प्रतिकारांच्यात कोठेच सुसंगती व सुसंवाद होता असे वाटत नाही. डिरान्ग गावाजवळच्या ‘लाग्याला गोम्पा’ या बौद्ध मठाजवळची लढाई या शोर्याचा व धैर्याचा मेरूमणी म्हणता येईल. लेफ्टनंट कर्नल ब्रम्हानंद अवस्थी व त्यांच्या हाताखालचे अधिकारी व सैनिक यांनी या ठिकाणी जो लढा दिला त्याची हकिगत सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखी आहे. ही लढाई संपली तेंव्हा भारतीय सेनेचे सर्व म्हणजे 126 सैनिक व अधिकारी, अवस्थी यांच्याबरोबरच या रणधुमाळीत मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मृत देहांच्याबरोबर 200 चिनी सैनिक व अधिकारी यांचे देहही त्या रणांगणावर पडलेले होते. या ठिकाणी असलेल्या दफनभूमीची स्थानिक लोक पूजा करतात. (चिनी सैन्याने सर्व भारतीय सैनिकांच्या देहांचे येथे दफन केले होते. अर्थात युद्ध संपल्यावर या सर्व शूर सैनिकांचे मृत देह बाहेर काढून त्यांच्यावर अग्नीसंस्कार केले गेले होते.) अवस्थी व त्यांचे सहकारी यांच्या अतुलनीय शोर्याचे वर्णन या दुव्यावर वाचता येईल.


ले. कर्नल ब्रम्हानंद अवस्थी, डिरान्गचा वाघ
बोमडी ला च्या दक्षिणेला माघार घेतलेले भारतीय सैन्य इतके खचलेल्या व निराश परिस्थितीत होते की बोमडी ला वर सरळ चढाई न करता बगलेला असलेल्या एका पायरस्त्यावरून विद्युतवेगाने चढाई करणार्‍या चिनी सैन्याचा प्रतिकार या पूर्णपणे धीर खचलेल्या सैन्याला करताच आला नाही व 19 नोव्हेंबरला चिनी सैन्याने बोमडी ला गाव सहज ताब्यात घेतले. बोमडी ला चे संरक्षण करण्यासाठी आणलेल्या रणगाड्यांनी चिनी सैन्याची चढाई रोखण्याचा बराच प्रयत्न केला पण चिनी सैन्याने आणलेल्या रणगाडा विरोधी तोफांमुळे अखेरीस त्यांचेही फारसे काही चालले नाही.
20 नोव्हेंबरला बोमडी ला सोडून भारतीय सैन्य या डोंगराळ भागाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांपर्यंत माघारी येऊ लागले. अत्यंत शूर म्हणून गणल्या जाणार्‍या या सेनेचे हे गलितगात्र, दीन रूप बघणे अत्यंत दु:खदायक होते असे अधिकृत अहवाल म्हणतो.
21 नोव्हेंबरच्या पहाटे बिजिंग नभोवाणीने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली व चिनी सैन्याची चढाई थांबवण्यात आली.
NEFA मधल्या कामेन्ग विभागातल्या या लढाईत ज्या पद्धतीने भारतीय सेनेला माघार घ्यावी लागली त्याच पद्धतीने सुबानसिरी, सियांग व लोहित विभागामधल्या भारतीय सेनांनाही लागली होती. मात्र फरक एवढाच होता की कामेन्ग विभागात थागला रिजजवळ सीमा विवाद तरी होता. इतर विभागांच्यात असा कोणताच विवाद नव्हता. चिनी सैन्याने कोणतेही कारण नसताना या ठिकाणी आक्रमण केले होते.
8 ऑक्टोबर 2010

2 comments:

  1. Hya sarva mahiti wachun niyojanala kiti mahatwa ahe he kalate. Dusre mhanje maze wadil he Nathula pass la hote 62 war nantar. Te sangat asat tethil sthiti ani chini lokanchi mujori. Ekunat deshane satarka asne avashyak ahe. Bhabada ashawaad kahi kamacha nahi.

    ReplyDelete
  2. NJ-
    1962 मधील युद्धाची माहितीच आता नवीन पिढीला नसते. तुम्ही म्हणता तसे सतर्क राहणे केंव्हाही श्रेयस्कर आहे.

    ReplyDelete