Monday, October 24, 2011

Marraiges and Gotra

Quantcast
नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्‍या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच चालू ठेवली आहे. दोन हजार किंवा तत्सम कालापूर्वी, प्रेषित म्हणून मानल्या गेलेल्या कोणा एका व्यक्तीने सांगितलेले नियम एकविसाव्या शतकातही आम्ही शिरोधार्य मानणार हे म्हणणे जसे सयुक्तिक आहे असे वाटत नाही त्याच प्रमाणे हजार वर्षापूर्वी कोण्या ऋषी मुनीने सांगितलेले सिद्धांत आजही ग्राह्य मानून त्याप्रमाणेच आम्ही वर्तन करणार हे म्हणणेही फारसे तर्कशास्त्रदृष्ट्या सुसंगत व सयुक्तिक आहे असे म्हणता येणार नाही.
ही गोत्र पद्धती आहे तरी काय? भारतात रहाणार्‍या ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य समाजातील लोकांचे या गोत्रात म्हणजे काही गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ब्राम्हण समाजातील लोकांचे, अंगिरस, अत्रि, कश्यप, भृगु, वशिष्ठ या सारख्या नऊ दहा गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. या गटांना काही ऋषिंची नावे दिली गेली आहेत. असे मानले जाते की हे ऋषि या गोत्राचे मूळ पुरुष होते.या शिवाय प्रवर, शाखा वगैरे आणखी वर्गीकरणे आहेतच. ही गोत्र व्यवस्था पूर्णपणे पितृसत्ताक असल्यामुळे लग्न होईपपर्यंत बापाचेच गोत्र मुलीचे असते व लग्न झाल्यावर ते नवर्‍याच्या गोत्राप्रमाणे बदलते. गोत्र म्हणजे कुल नव्हे. एकच कुल देवता असलेली कुटुंबे एका कुलातली मानली जातात. त्यांच्यातील परस्पर विवाह संबंध निषिद्ध मानले जात नाहीत. मात्र सगोत्र (म्हणजे ज्या ठिकाणी वर आणि वधु हे एकाच गोत्राचे असतात) विवाह संबंध निषिद्ध मानले जातात.
आता असल्या जुनाट  रुढी व समजुतींचे कोणाला पालन करावेसे वाटत असले तर त्यांनी करावे. इतर लोकांना त्यात पडण्याची काही जरूरी व गरज आहे असे मला तरी वाटत नाही. परंतु ही गोत्र व्यवस्था अतिशय शास्त्र शुद्ध असून आधुनिक जनुक शास्त्रातील तत्वांना धरून असल्यामुळे या गोत्र व्यवस्थेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी आता ही खाप पंचायत करू लागली आहे. ही गोत्र व्यवस्था Genealogy किंवा Genetic studies मधली निरिक्षणे व अनुमाने यांना धरून आहे का नाही? हेच पडताळून बघण्याचा या लेखाचा उद्देश आहे. गोत्र व्यवस्था ही जनुक शास्त्रातील तत्वांना धरून आहे का? हे शास्त्रीय पद्धतीने शोधून काढावयाचे असले तर त्यासाठी शास्त्रीय बैठक असलेली शोधपद्धती आवश्यक आहे व तीच अनुसरली पाहिजे.


मानवी शरीर हे पेशींपासून बनलेले असते हे सर्वज्ञात आहे. या पेशीमधले दोन घटक या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. प्रत्येक पेशीमधे एक केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूत 23 रंगसूत्रांच्या (Chromosomes) जोड्या असतात. प्रत्येक रंगसूत्रात, डी.एन..(D.N.A) या द्रव्याची सर्पिल आकाराची एक लांबलचक साखळी असते. एका रंगसूत्राच्या जोडीत एक रंगद्रव्य पित्याकडून आलेले व एक मातेकडून आलेले असते. प्रत्येक रंगसूत्राच्या साखळीत ऍडिनिन (), गुवानिन (जी), सायटोसिन (सी), थायमिन (टी) ही प्रमुख व महत्वपूर्ण रसायने असतात. ही सर्व रसायने वेगवेगळ्या अनुक्रमाने साखळीमधे गुंफलेली असतात. उदाहरणार्थ, सीजीएटीसीएजीटीटीसीएजीटीसीएएजीटी वगैरे. अशा अनुक्रमांच्या पद्धतीने या रसायनांच्या अनेक साखळ्या असतात. त्या काही वेळा मूळस्वरूपी पूर्ण शृंखला रूपात किंवा लघुस्वरूपी पुनरावृत्तीय शृंखला या स्वरूपात असतात.

डी.एन.ए. साखळी
रंगसूत्राची शेवटची म्हणजे 23वी जोडी त्या शरीराचे लिंग ठरवते. स्त्रीच्या शरीरात या 23व्या जोडीत दोन्ही समान रंगसूत्रे असतात व त्यांना एक्स(X) रंगसूत्र म्हणतात. पुरुषाच्या शरीरात, या जोडीतील एक रंगसूत्र एक्स प्रकारचे व दुसरे त्याहून भिन्न म्हणजे वाय(Y) प्रकारचे असते. बापाकडून आपल्या पुरुष वारसाला मिळालेला हा वाय क्रोमोसोम, हुबेहुब त्याच्या स्वत:च्या वाय क्रोमोसोमसारखा असतो. म्हणजेच आजोबा, बाप, मुलगा, काका, चुलत भाऊ या सगळ्यांच्या शरीरातील पेशीत बरोबर हुबेहुब असा तोच वाय क्रोमोसोम असतो. यालाच पुरुष वारसासाखळी (Male Lineage) म्हटले जाते.
शरीरातील प्रत्येक पेशीमधे केंद्रबिंदूच्या बाहेर जी द्रव्ये असतात त्यात काही घन पदार्थही असतात. त्यांना मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) असे म्हणतात. या मायटोकॉन्ड्रिया मधे सुद्धा डी.एन..च्या साखळ्या असतात. आईकडून आपल्या मुलांना हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. मिळतो व तो हुबेहुब आईच्या स्वत:च्या मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. सारखाच असतो. या आईच्या फक्त मुलीच हा मायटोकॉंड्रिअल डी. एन.., आपल्या मुलांच्याकडे जसा का तसा पुढे पाठवू शकतात. म्हणजेच आजी, आई, मुलगी, मावशी, मावसबहिणी या सर्वांत हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.,. हुबेहुब सारखाच असतो. यालाच स्त्री वारसासाखळी (Female Lineage) असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर वाय रंगद्रव्य, पुरुष वारसासाखळी ठरवण्यास व मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. स्त्री वारसासाखळी ठरवण्यास अत्यंत महत्वाचे ठरतात. मायटो कॉंन्ड्रिअल डी.एन.. मधे रसायनांचे अनुक्रम कमी असल्याने त्यांचा अभ्यास करणे वाय क्रोमोसोम मधील डी.एन. ए पेक्षा सोपे जाते व त्यामुळे याचा जास्त सखोल अभ्यास झाला आहे. परंतु दोन्ही वारसा साखळीत तसा मूलभूत फरक काहीही नाही.

अनेक पिढ्यांच्या या वारसा साखळीचा अभ्यास संगणकाच्या सहाय्याने केल्यावर शास्त्रज्ञांना एक अतिशय अजब गोष्ट आढळून आली. आधुनिक मानवाचा इतिहास सुमारे 150000 वर्षांपूर्वी आफ्रिकेत वास्तव्य असणार्‍या एका मानवी गटापासून सुरू झाला आहे. या मानवी गटात हजारावर तरी स्त्रिया असाव्यात असा अंदाज करता येतो. असे असले तरी आज पृथ्वीवर असलेली प्रत्येक स्त्री या हजार स्त्रियांपैकी फक्त एकाच स्त्रीची वंशज आहे. म्हणजे या मूळ गटातील इतर सर्व स्त्री वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त पुरुष वंशजच उरले व त्यामुळे त्यांच्या वारसा साखळ्या नष्ट (Extinct) झाल्या.या स्त्रीला आधुनिक मानवी ईव्ह असे म्हणले जाते. कोणत्याही एका मोठा गटातील स्त्रियांच्या वारसा साखळ्या या पद्धतीने अभ्यासल्या तर असेच आढळून येते की फक्त एक आणि एकच वारसा साखळी चालू रहाते व बाकी सर्व वारसा साखळ्या, मुलगे झाल्याने नष्ट होतात.बरोबर याच पद्धतीने 60000 वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या फक्त एका पुरुषाचे, आज पृथ्वीवर हयात असलेले सर्व पुरुष हे वंशज आहेत. म्हणजेच त्या पुरुषाच्या कालात त्याच्या बरोबर जे इतर पुरुष होते त्या सर्वांच्या वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त मुलीच झाल्या व त्यांची पुरुष वारसा साखळी नष्ट (Extinct)झाली. या पुरुषाला आधुनिक ऍडम असे म्हणले जाते. आता आधुनिक ईव्ह व आधुनिक ऍडम यांच्यात ऐंशी नव्वद हजार वर्षांचे अंतर आहे ही मोठी गंमतीची गोष्ट आहे इतकेच. बाकी त्याला तसे महत्व फारसे नाही. फक्त एकच पुरुष किंवा स्त्री यांच्याच वारसा साखळ्या चालू राहून त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या समकालीन इतर स्त्री पुरुषांच्या वारसा साखळ्या ,काही कालाने नष्ट होण्याच्या तत्वाला Extinction Principle असे नाव आहे.या सगळ्या पृथ:करणाचा गोत्र व्यवस्थेशी कसा संबंध जोडता येतो ते पाहू. भारतातील मानवी वास्तव्य सुमारे 74000 वर्षांपूर्वी संपूर्णपणे नष्ट झाले होते. ( टोबा ज्वालामुखी) या नंतर फक्त 10,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव परत भारतीय उपखंडात आले. आर्य संस्कृती तर इ..पूर्व 1500 नंतरच भारतात आली. त्यामुळे इ..पूर्व 1000 हा कालखंड आपल्याला या गोत्र व्यवस्थेसाठी अगदी पूर्वीचा म्हणून मानता येईल. आता असे धरून चालू की या कालखंडातील गोत्रपुरुष असलेल्या या नऊ किंवा दहा ऋषिंपासून भारतातील सध्याची उत्तर भारतीय ब्राम्हण पुरुष लोकसंख्या निर्माण झाली आहे. 3000 वर्षात फक्त 75 च्या आसपास पिढ्या होतात. भारताची एकूण लोक संख्या 120 कोटी. उत्तरेकडच्या राज्यातील जनसंख्या अंदाजे 80 कोटी. त्यापैकी निम्मे पुरुष म्हणजे 40 कोटी. त्यापैकी 5% ब्राम्हण समाजाचे असावेत असे धरून ब्राम्हण पुरुष, 2 कोटी. गणिती व संख्याशास्त्रीय शक्यतेप्रमाणे 9 पुरुष 75 पिढ्यांमधे या पेक्षा कितीतरी जास्त पटीने वंशज निर्माण करू शकतात. परंतु तसे न घडण्याची दोन कारणे वाटतात.
1. मागच्या 3000 वर्षातील व्यक्तींची आणि विशेषत: स्त्रियांची, आयुष्य मर्यादा, बाल मृत्युंचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतले तर एवढे वंशज निर्माण होणे कठिण वाटते.
2. या पेक्षा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 9 पुरुषांपासून सुरू झालेल्या वारसा साखळ्या, 75 पिढ्यांनंतर टिकून रहाण्य़ाची शक्यता (Extinction Principle) मुळे जवळ जवळ नाहीच. या पैकी एक किंवा फार तर दोन पुरुष वारसा साखळ्या टिकून राहिल्या असाव्यात. यामधेही आणखी काही कालानंतर फक्त एक आणि एकच वारसा साखळी टिकून राहील. ती कोणत्याही ऋषिची असू शकते. याचा अर्थ असा की अस्तित्वात असलेला सर्व ब्राम्हण समाज एक किंवा फार तर दोन ऋषिचे वंशज असणार आहेत. यामुळेच गोत्र पद्धतीला व सगोत्र विवाहाला विरोध या सगळ्या गोष्टींना काही शास्त्रीय बैठक आहे असे म्हणणे धाडसाचे ठरावे.
तरीही क्षणभर आपण असे मानू की इ..पूर्व 1000 मधे अस्तित्वात असलेले हे नऊ किंवा दहा ऋषिच सर्व उत्तर भारतीय ब्राम्हण समाजाचे पूर्वज आहेत. परंतु हे नऊ किंवा दहा ऋषी काही आकाशातून पडलेले नाहीत. ते ही कोणाचे तरी वंशजच आहेत. व त्या सर्वांचा मूळ पुरुष वर निर्देश केलेल्या तत्वाप्रमाणे एकच असला पाहिजे. एकच पूर्वज असलेले हे ऋषी मग निरनिराळ्या गोत्रांचे कसे असणार? ते तर सर्व एकमेकांचे भाऊबंदच असणार. त्यामुळेच गोत्र व्यवस्थेच्या संकल्पनेला शास्त्रीय आधार किंवा बैठक आहे असे मी तरी म्हणणार नाही.
खाप पंचायतीच्या मागणीला कोणतीही शास्त्रीय बैठक आहे असे मला तरी वाटत नाही. त्याला राजकीय डावपेच समजून तसेच उत्तर देणे आवश्यक आहे.
13 जुलै 2010

No comments:

Post a Comment