Saturday, October 22, 2011

Quick March to Africa

Quantcast
काही दिवसांपूर्वी, भारतातल्याच, ‘भारती एंटरप्रायझेसया कंपनीचे 52 वर्षाचे संचालक व एक बडे उद्योजक श्री सुनील मित्तल यांनी कुवेत या देशात स्थित असलेल्या झैन‘ (Zain) या कंपनीचा आफ्रिकेमधला सर्व पसारा आपण विकत घेतल्याचे जाहीर केले व असे म्हणता येईल की भारतीय कंपन्यांना एक नवीन कार्यक्षेत्र दाखवून दिले. काही विश्लेषणकारांनी या घटनेचे वर्णन, आफ्रिका खंडात प्रवेश मिळवू पाहणार्‍या चिनी कंपन्यांच्या बरोबरीने, भारतीय कंपन्याही या स्पर्धेत उतरत आहेत याची ही नांदीच आहे असे केले आहे. दुसर्‍या देशांच्यावर आपला राजकीय प्रभाव पडावा किंवा तिथले नैसर्गिक स्त्रोतांचा (natural resources) आपल्याला फायदा मिळावा म्हणून आंतर्राष्ट्रीय व्ह्यूहात्मक खेळ्या अनेक देश शतकानुशतके करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मध्यपूर्वेत, तेलासाठी प्रथम ब्रिटनने व नंतर अमेरिकेने केलेले उपद्व्याप हे नक्कीच देता येईल. परंतु श्री. मित्तल यांची ही उडी राजकीय खेळ्यांपेक्षा बरीच जास्त लांबवरची वाटते आहे.

श्री. हॅरी ब्रॉडमन या लेखकाने नुकतेच “Africa’s Silk Road: China and India’s New Economic Frontier.” या नावाचे एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात श्री. ब्रॉडमन म्हणतात की भारतीय लोक आफ्रिकेमधे आर्थिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व दृष्टींनी तिथल्या समाजात आधीपासूनच सामावून गेलेले आहेत. आफ्रिकन समाजात मिसळून गेलेला भारतीय समाज, वर वर पाहणार्‍याला सहजतने दिसून येत नसला तरी त्याचा खूप अप्रत्यक्ष फायदा, आफ्रिकेत नवीन प्रवेश घेऊ पाहणार्‍या भारतीय कंपन्यांना, चिनी कंपन्यांच्या मानाने होणार आहे. अर्थात या साठी या भारतीय कंपन्यांना आफ्रिकेमधे बराच काल अस्तित्व ठेवणे गरजेचे आहे.
आर्थिक तज्ञांच्या मते सध्या या स्पर्धेत, भारत चीनच्या खूपच पिछाडीवर आहे. चिनी कंपन्या सरकारी असल्याने त्यांचे खिसे अर्थातच भरगच्च भरलेले आहेत. त्यामुळे घर किंवा इतर बांधकाम उद्योग, तेल आणि खाणकाम या सर्व क्षेत्रात चिनी अग्रेसर आहेत असेच चित्र दिसते आहे. चिनी सरकारने आफ्रिकेत 8 बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे तर भारतीय सरकारने फक्त 2 बिलियन डॉलर्सची. आफ्रिका व भारत यांच्यामधल्या व्यापाराच्या तिप्पट व्यापार, चीन व आफ्रिका यांच्यामधे होतो आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीने केलेली 10.7 बिलियन डॉलर्सची ही गुंतवणूक ही फार रोचक गोष्ट आहे असे वाटते. या गुंतवणूकीनंतर, मोबाईलधारकांची संख्या विचारात घेतली तर भारती ही जगातली पाचव्या क्रमांकाची मोबाईल कंपनी बनली आहे. त्यांची ग्राहक संख्या आता 4.2 कोटी एवढी झाली असून अफ्रिका खंडातील 15 देशांच्यात त्यांचे अस्तित्व प्रस्थापित झाले आहे. भारतामधे भारतीची मोबाईल सेवा एअरटेल या नावाने दिली जाते व भारतामधे असलेले जगातील सर्वात कमी कॉलचे दर आणण्यात या एअरटेल कंपनीचा महत्वाचा वाटा आहे. श्री.मित्तल यांच्या म्हणण्याप्रमाणे आफ्रिकेमधले कॉलचे दर भारताच्या दहा पट तरी असल्याने त्यांचे पहिले कार्य, हे दर खाली आणणे हे असणार आहे.
आर्थिक विश्लेषणकारांनी मात्र भारतीच्या या गुंतवणूकीला लाल सिग्नल दाखवला आहे. त्यांच्या मते आफ्रिकेमधल्या या 15 देशात आपली सेवा प्रस्थापित करताना, या देशांतील बहुविध संस्कृती, कायदेकानू
व भाषा यामुळे भारतीला खूप अडचणी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीचे क्रेडिट रेटिंग आंतर्राष्ट्रीय बाजारात कमी करण्यात आले आहे. श्री. मित्तल यांनी या आधी भारतीने बांगलादेश मधली वरीद टेलेकॉम ही कंपनी ताब्यात घेऊन अशीच स्पर्धा त्या देशात सुरू केली होती.
श्री. मित्तल मात्र आपल्या गुंतवणूकीबाबत आशादायक आहेत. त्यांच्या मते देशाच्या सरकारने दुसर्‍या देशात गुंतवणूक करण्याचे दिवस आता सरले आहेत. भारतीय कंपन्यांना सरकारी आर्थिक मदतीची अजिबात गरज नाही. सरकारने आफ्रिका व भारत यांच्यातील दळणवळण सेवा सुधारल्या तरी पुरेल. भारताची राष्ट्रीय विमान वाहतुक सेवा किंवा एअर इंडियाला सरकारने आर्थिक मदत करावी असे श्री. मिट्टल यांना वाटते. एवढे केले तरी भारतीय उद्योग आफ्रिकेमधे मोठ्या संख्येने येतीलअसे ते म्हणतात.
श्री. मित्तल यांच्या म्हणण्याला, श्री ब्रॉडमनही आपल्या पुस्तकात दुजोरा देताना दिसतात. त्यांच्या मते गेल्या काही वर्षात आफ्रिकेमधे जी आर्थिक प्रगती होते आहे ती नायजेरिया सारख्या ज्या देशात नैसर्गिक स्त्रोत अधिक आहेत त्यांच्यापेक्षा असे स्त्रोत नसलेल्या देशांच्यात होते आहे. या देशांच्यातील आर्थिक प्रगतीचा वेग 5.6 % पर्यंत पोचला आहे. या बदलाची दखल पाश्चात्य देशांपेक्षा चीन व भारत यांनी जास्त प्रमाणात घेतलेली दिसते आहे. हे दोन्ही देश करत असलेल्या गुंतवणूकीच्या पॅटर्नवरून हे दिसते आहे की हे देश विविध क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू, पर्यावरण स्वच्छता व खाद्य प्रकल्प सारख्या पूर्णपणे भिन्न भिन्न क्षेत्रात ही गुंतवणूक होताना दिसते आहे. गुंतवणूकीचा हा पॅटर्न भारताला जास्त लाभदायक ठरणार असे दिसते आहे.
भारताचे आफ्रिकेतल्या राष्ट्रांबरोबर ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. तसेच भारतीय व आफ्रिकेतील देश यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाण नेहमीच होत राहिलेली आहे. भारतीय गुंतवणूक ही मुख्यत्वे उद्योजक व्यक्ती या नात्याने करत असल्याने, भारतीय प्रकल्प, स्थानिक आर्थिक व्यवस्थेबरोबर मिसळून गेलेले दिसतात. या उलट चिनी प्रकल्प स्थानिक आफ्रिकन लोकांपासून तुटलेले वाटतात. या प्रकल्प उभारणीसाठी चिनी मजूर व लागणार्‍या सर्व वस्तू चीनहून आयात केल्या जातात. भारतीय प्रकल्पांसाठी स्थानिक पुरवठादारांच्या साखळ्या आयोजित केल्या जातात व ते स्थानिक लोकांच्यात मिसळून गेल्यासारखे वाटतात. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाप्रमाणे आफ्रिकेत स्थायिक झालेल्या भारतीय उद्योजकांच्यापैकी निम्याहून जास्त उद्योजकांनी त्या देशाचे नागरिकत्व पत्करले आहे तर अशा चिनी उद्योजकांपैकी 96 % अजून चिनी नागरिकच आहेत.
कदाचित तेल किंवा खनिज प्रक्रियेसारख्या उद्योगात हे स्थानिकीकरण महत्वाचे नसावे पण ज्या ठिकाणी सेवा द्यावयाची आहे अशा विक्री किंवा दळणवळण या सारख्या क्षेत्रात हे स्थानिकीकरण अतिशय महत्वाचे ठरेल.
भारती एन्टरप्रायझेसची झैनमधली गुंतवणूक या दृष्टीने फारच महत्वाची आहे. सध्या भारत व चीन यामधली स्पर्धा जरी ससा आणि कासव यासारखी वाटली तरी शेवटी गोष्टीतल्या कासवाप्रमाणे मागे असलेला भारतच ही स्पर्धा जिंकण्याची अधिक शक्यता वाटते.
11 जुलै 2010

No comments:

Post a Comment