Thursday, September 29, 2011

Coorg Diary -Part II

Quantcast
बुधवार
नेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत. काय भानगड आहे म्हणून फ्रेंच विंडोवरचा पडदा बाजूला सारला. बाहेर तर काहीच गडबड दिसेना. सगळे कसे शांत व नीरव भासत होते. पण कानावर प्रचंड कोलाहल तर पडतच होता. शेवटी राहवेना. उठलो व बाल्कनीचे दार उघडले. सोसाट्याचा वारा एकदम आत घुसावा तसा आवाजाचा एक प्रचंड कोलाहल खोलीत घुसला. इंग्रजीमधे एक शब्द आहे Cacophony म्हणून. या शब्दाचा अर्थ मला कधीच नीट समजला नव्हता. आता या क्षणाला कानावर पडणारे ते आवाज ऐकून या शब्दाचा खरा अर्थ मला उमजतो आहे असे वाटले. बाहेर सगळे स्तब्ध होते. मग हा कोलाहल कसला असावा बरे? पण लगेचच डोक्यात प्रकाश पडला. हा सगळा कोलाहल आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेल्या पक्षीगणांचा होता. पक्षी एवढ्या विविध प्रकारचे व एवढे मोठे आवाज काढू शकतात हे मला आतापर्यंत ज्ञातच नव्हते.
आम्ही मुक्काम ठोकला आहे त्या रिसॉर्टची रचना मोठी छान आहे. खरे म्हणजे एका दरीतच हा रिसॉर्ट आहे. दरीच्या वरच्या टोकाला, परिमितीवर, निवासी संकुले आहेत. थोड्या खालच्या पातळीवर निरनिराळी रेस्टॉरंट्स, बच्चे मंडळींसाठी Fun Zone यांची व्यवस्था आहे. त्याच्या खालच्या पातळीवर ऍडव्हेंचर झोन, Gym आणि मसाज पार्लर आहे. या सर्वांच्या मधे व आजूबाजूला गर्द झाडी, इतकी गर्द की या इमारती काही वेळा दिसतही नाहीत. थोडक्यात म्हणजे भेट देणार्‍या पाहुण्यांना, सतत गुंतवून कसे ठेवता येईल हे बघितले आहे. या निवासी संकुलांना, निरनिराळ्या पण अनकॉमन वृक्षांची नावे दिली आहेत. त्यामुळे आम्ही जोजुबा किंवा लोकूचा मधे राहतो आहे हे सांगायला मलाही जरा गंमत वाटली.
या जिल्ह्याचे कूर्ग हे नाव जास्त प्रचलित असले तरी ते आंग्लाळलेले नाव आहे. कन्नड भाषेत या जिल्ह्याचे नाव आहे कोडागु. या कोडागु लोकांची निराळी संस्कृती आहे. ती कन्नड लोकांच्या पेक्षा केरळी लोकांना जास्त जवळची आहे असे माझे तरी मत झाले आहे. या कोडागु जिल्ह्यातले सर्वात महत्वाचे ठिकाण कोणते असे जर स्थानिकांना विचारले तर एक मुखाने उत्तर येते, तालकावेरी. उत्तर हिंदुस्थानात गंगा नदीला जे महत्व आहे ते इथे दक्षिणेत कावेरी नदीला आहे. गंगेला गंगामैय्या म्हणून संबोधण्यात येते. त्याच धर्तीवर कावेरीला कावेरी ताई म्हणतात. खरे तर कन्नड मधे आईला अम्मा असा शब्द आहे. पण कावेरी अम्मा म्हणत नाहीत. मी आमच्या इनोव्हाच्या चालकाला हा प्रश्न विचारायला विसरलो नाही. पण त्याचे म्हणणे पडले की कन्नड मधे ताई म्हणजे सुद्धा आईच. खरे खोटे ते कन्नड भाषीय सांगू शकतील. ही कावेरी ताई उगम पावते कोडागु जिल्ह्यातल्या तालकावेरी या स्थानामधे व म्हणूनच दक्षिण भारतामधे, उत्तरेच्या गंगोत्री सारखेच, तालकावेरी या स्थानाला महत्व आहे. तालकावेरीला उगम पावल्यावर या कावेरी ताई प्रथम श्रीरंगपट्टण जवळून वहातात. या ठिकाणी कृष्णराज सागर हे धरण या नदीवर बांधलेले आहे. प्रसिद्ध वृंदावन बाग याच ठिकाणी आहे. कावेरी नदीवर दुसरे महत्वाचे धरण मेट्टूर येथे तामिळनाडू मधे आहे. शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला तंजौरच्या जवळ जाऊन मिळते.
लवकर निघायचे असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी 11 च्या सुमारास आम्ही तालकावेरीला जायला निघालो आहोत. मडिकेरीच्या साधारण नैऋत्येला जाणारा हा रस्ता अतिशय वळणावळणाचा आणि अरूंद आहे. परंतु आमच्या इनोव्हाच्या चालकाची तो मारुती 800 चालवतो आहे अशी प्रामाणिक समजूत दिसते आहे. साधारण 40 किलोमीटर अंतरावर आमची गाडी थांबते. कावेरी नदीला या ठिकाणी आणखी दोन नद्या येऊन मिळतात असे आमच्या चालकाचे म्हणणे आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर हा संगम लागतो.

4 comments:

 1. कृपया आपण कोणत्या रेसोर्ट मध्ये होता ते सांगितले तर बरे होईल कारण बरेच होटेल जाहिरात खुपच करतात व प्रत्यक्ष गेल्यावर निराशा होते बाकी वर्णन सुरेख आहे

  ReplyDelete
 2. क्लासिक मराठी

  मी कूर्गला महिंद्र क्लब रिसॉर्ट मधे राहिलो होतो.

  ReplyDelete
 3. खुप सुंदर लेख..फोटोही आवडले

  ReplyDelete
 4. सुनिल पाटकर -

  प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  ReplyDelete