Sunday, March 27, 2011

Panshet 1961

Exactly 48 years back on this day  or on 12 July 1961, I was studying in the Pre-Degree  (Equivalant to today's 12th standard) class in Pune's Fergusson College. We used to have our first lecture around 10 AM. That day, the first lecture was for Physics and was held in the P2 classroom of the Physics department of the college. As I remember, this first lecture was going on that fateful day, when all of a sudden our vice-principal D.G.Dhawale entered the classroom through entry door meant for the lecturers. He requested the lecturer to interrupt his lecture and made an announcement that was going to change the life for scores of Pune citizens. He announced that there is a likelihood of very heavy flooding in the areas near banks of Mutha river. The college would be closed immediately and all students and staff should go home. 
नदीला पूर येणे ही काही फारशी नवीन बाब पुणेकरांना त्या काळात तरी वाटत नसे. त्यामुळे महाविद्यालय कसे काय बंद केले बुवा? अशा थोड्याश्या आश्चर्यचकित मुद्रेनेच आम्ही बाहेर पडलो. सरळ घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. सायकल आपोआपच लकडी पुलाकडे वळली. तिथे पाहिले तर वाहतुक नेहमीसारखीच सुरू होती. 2/4 पोलिस हवालदार जास्त वाटले, पण सायकलवरून डबल सीट कां चालला? म्हणून दंड करण्याऐवजी ते सगळ्यांना लवकर लवकर चला म्हणून विनंती करताना तेवढे दिसले. एकंदरीत फारसे सिरियस काही नसावे असे वाटून मी घरी परत आलो. गाडी अंगणात दिसली नाही म्हणून बघितले तर आमची आई, माझ्या भावाला, शाळा नदीच्या पैलतीरावर असल्याने, घरी आणण्यासाठी गेल्याचे समजले. वडील कारखान्यात गेले होते. थोड्याच वेळात आई भावाला घेऊन परतली. मला घरी पाहून तिचा जीव भांड्यात पडला. थोड्या वेळाने वडील पण घरी आले. कारखाना नदीच्या काठावरच असल्याने, तो बंद करूनच ते आले होते. तेंव्हा मोठा पूर येणार आहे एवढेच कळले होते. मी परत सायकल बाहेर काढली आणि फार दूर न जाण्याचे आईला कबूल करून कर्वे रस्त्याकडे वळलो. एव्हांना पोलिसांनी शंकराच्या देवळाकडे जाणारा रस्ता (सध्या नळ स्टॉप कडून मेहेंदळॆ गॅरेजकडे जाणारा चौक) बंद केला होता. समोर नदीचे लालसर पाणी एव्हांना दिसायला लागले होते. तसाच थोडा पुढे गेलो. एम.इ.स. कॉलेजपाशी (सध्याचे गरवारे) नदीचे पाणी कर्वे रस्त्यावर आलेले दिसले. मग जरा वेळ इकडे तिकडे बघून घरी परत आलो.

punfld2
होळकर पूल
 

अफवांचे पीकच फुटले असल्यासारखे एकूण दिसत होते. कोणी म्हणे खडकवासला धरणावरून पाणी वाहते आहे. कोणी म्हणे संपूर्ण शहरच बुडणार आहे. लोकांच्यात घबराट तर इतकी उडाली होती की बरेच लोक हनुमान टेकडीवरच जाऊन बसले होते. कुठलीही अधिकृत बातमी कळू शकत नव्हती. आकाशवाणी केंद्रावरून तर कोणीतरी गायक कंटाळवाण्या आवाजात रागदारीच  गात होता. ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या ऑफिसमधला फोन, कोणी उचलतच नव्हते. पोलिसांनाही काही माहिती नव्हती. नळाला पाणी येण्याचे केंव्हाच बंद झाले होते. उपहारगृहे, हॉटेल्स सर्व बंद झाले होते. माझ्या वडिलांच्या कारखान्यात, तेंव्हा 60/65 मंडळी कामाला होती. त्यांना घरीही जाणे शक्यच नव्हते आणि त्यांचे डबेही येणे शक्य नव्हते. मग आमच्या आईने दोन बायकांच्या मदतीने या सगळ्या लोकांना पिठले भात खाऊ घातल्याचे मला आठवते.

punfld3_gif

बंडगार्डनचा पूल
 
दुपारी 2 च्या सुमारास पाणी आणखी वाढल्याचे समजले. आता मात्र बहुतेकांचे चेहरे चांगलेच गंभीर झाल्याचे कळत होते. मुख्य अडचण म्हणजे कोणतीही अधिकृत बातमी मिळतच नव्हती. असाच तो दिवस आम्ही सगळ्यांनी बसून काढला. वीज नव्हतीच त्यामुळे सगळीकडे रात्री कंदिल लागले. अधिकृत रित्या तोपर्यंत कळत काहीच नव्हते. माझ्या वडीलांच्याकडे एक बॅटरीवर चालणारा ट्रांझिस्टर रेडियो होता. त्यावरूनही कसलीही घोषणा कोणत्याही अधिकृत सूत्राकडून आतापर्यंत नव्हती. रात्री 9 वाजताच्या दिल्लीहून येणार्‍या बातम्यांच्यात, प्रथम आम्ही ऐकले की पानशेतचे धरण फुटल्यामुळे पुण्यात पूर आला आहे आणि तो ओसरतो आहे. खडकवासल्याचे धरण पानशेतच्या पुढे असल्याने त्याचे काय? या प्रश्नाचे काहीही उत्तर कोणालाच माहिती नव्हते. बहुतेकांनी ती रात्र जागून काढली. दुसर्‍या दिवशी सकाळी खडकवासला फुटले अशी अफवा फुटली आणि प्रचंड घबराट उडाली. पण नदीचे पाणी मात्र ओसरतच गेले. दोन दिवसांनंतर पुराची भिती सगळ्यांच्याच मनातून गेली पण समोर आ वासून उभे राहिले, जनसामान्यांचे जीवन पूर्ववत करण्याचे एक प्रचंड आव्हान!

punfld1

ओंकारेश्वर
 

सकाळच्या छपाईयंत्रांच्यात चिखल गेल्याने ती कुचकामीच झाली होती. दुसरा एक छोटा प्रेस चालू करून सकाळने 2 दिवसात वर्तमानपत्र बाहेर काढले व इतक्या दिवसांनंतर सत्य परिस्थिती सर्वसामान्यांना समजली. नदीला सकाळी 11च्या सुमारास तो पानशेत फुटल्याने व 2 च्या सुमारास वाढलेले पाणी, खडकवासला फुटल्याने आले हे लोकांना प्रथम समजले. बंड गार्डनचा सोडला तर बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या नारायण, सदाशिव, कसबा आणि सोमवार या पेठांची अपरिमित झालेली हानीही याच वेळेला आमच्या नजरेसमोर आली. माझा एक वर्गमित्र स्वानंद गोगटे याचे घर नदीच्या अगदी काठी होते. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते. अशीच परिस्थिती हजारो पुणेकरांची झाली होती. नदीच्या काठच्या रस्त्यांवर एक दीड फूट जाडीचा चिखलाचा थर आणि त्यामुळे येणारा एक विशिष्ट वास हा सर्व पुणेकरांच्या पुढची दोन तीन वर्षे चांगलाच परिचयाचा झाला होता.

punfld4
जवानांची मदत
 

शहराचा पाणी पुरवठाच नष्ट झाल्याने आता पुढे काय हा प्रश्न होताच. धरणे फुटल्याने नदीला सतत पाणी होते. त्याचा वापर करून एका जोडकालव्याद्वारे शहराचा पाणीपुरवठा परत चालू करता ये ईल अशी एक योजना एक अभियंते श्री. ठोसर यांनी मांडली. महानगरपालिका आणि सरकार यांनी ती मान्य केली आणि महिन्याभरात पाणी पुरवठा चालू झाला. पूरग्रस्तांचे पुनर्वसनात खूप लोकांनी मदत केली सैन्याच्या दक्षिण कमांडनेही चांगलाच हातभार लावला.

punfld5
लकडी पूल
 
सरकारी यंत्रणांची ढिसाळ कामगिरी लोकांच्या चांगलीच नजरेत आली. रोम जळत असताना सम्राट निरो फिडल वाजवत होता असे म्हणतात. आकाशवाणीने, आपण त्याचे आधुनिक वंशज असल्याचे पुराच्या काळात रागदारी ऐकवून दाखवून दिले. आता वीजच नसल्याने बहुतेकांना ते ऐकताच आले नाही हे त्यांचे नशीबच! नंतर समजले की बी.बी.सी. ने आकाशवाणीच्या आधीच, पुराची बातमी जगभर लोकांना ऐकविली होती.

punfld6
लकडी पूल मागे पर्वती दिसते आहे.
 

या पुराने पुण्याचे स्वरूपच बदलले. जुने ऐतिहासिक पेशवेकालीन पुणे वाहूनच नष्ट झाले. नदीच्या काठची मध्यमवर्गीय वस्ती हळूहळू कोथरूड वगैरे उपनगरांच्याकडे सरकू लागली. पण याचबरोबर जुन्या पुण्याचा चार्मच गेला. पुणे इतर एखाद्या शहरासारखेच वाढू लागले. अनियंत्रित, बकाल आणि अस्तावस्त.
12 जुलै 2009

8 comments:

  1. आपला हा ब्लॉग म्हणजे मी मुंबईकर असून माझ्या पुण्यावरील प्रेमामुळे अत्यंत जिव्हाळ्याचा भाग. ११ जुलै १९६१ रोजी पुण्यातील पानशेत धरण फुटले आणि पुण्यातच नव्हे सा-या महाराष्ट्रात एकच हाहाःकार उडाला. पानशेतच्या पाणलोटात जुने पुणे वाहून गेले आणि नवे जन्माला आले. या घटनेला जुलै १९८६ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. त्या वेळी अभिनव प्रकाशनाचे कै. वा.वि. भट यांनी त्यांच्या 'संग्रहालय' या मासिकात "पानशेतच्या प्रलयानंतरचे पुणे" असे दोन लेख प्रसिद्ध केले होते. मी त्या वेळी भट यांना संपादनाच्या कामात सवड होईल तशी मदत करत असे. त्याची आठवण आपल्या या लेखावरून झाली. आपण दिलेले फोटो, पुण्याची ती दशा पहावत नाही, असे आहेत. आता मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, पानशेत प्रलयानंतरचे पुणे, यावर आपल्याकडून लिहिलेले अपेक्षित आहे.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  2. मन्नब


    धन्यवाद. पानशेत प्रलयानंतरचे पुणे हा लेखासाठी अतिशय रोचक विषय आहे. मी या विषयावर लेखन करण्याचा जरूर प्रयत्न करीन

    चंद्रशेखर

    ReplyDelete
  3. फोटो आणि माहितीसाठी धन्यवाद त्याकाळी माझा जन्म सुद्धा झाला नव्हता, पण हि माहिती वाचून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना करता आली.

    अनिकेत
    http://manatale.wordpress.com

    ReplyDelete
  4. अनिकेत आमच्या पिढीतल्या लोकांसाठी पानशेत 1961 व त्यानंतरचे चीन बरोबरचे युद्ध 1962 हे अत्यंत महत्वाचे माईलस्टोन होते. पानशेत नंतर आमचे ओळखीचे पुणे एकदम बदलूनच गेले. हा बदल चांगला की वाईट हे मला सांगणे कठिण आहे. पण काहीतरी हरवल्याची जाणीव मात्र राहिली आहे.

    ReplyDelete
  5. khupach chhan me pan punyala shikalo ahe mala wachun khup mahiti milali

    ReplyDelete
  6. आज १२ जुलै २०१५. आपण ती जुनी आठवण पुनः करून देत आहात. मी पुनः आपल्याला " पानशेत प्रलयानंतरचे पुणे " हा लेख लिहिण्याची विनंती करत आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
  7. मी १९६० मध्ये पुणे सोडून नागपूरला गेलो. तिथे पुराच्या फारश्या बातम्या दिसल्या नाहीत.
    बरेच दिवसांनी कळले की नारायण पेठेतल्या आमच्या आत्याबाई नि त्यांची लहान मुलगी या दुसऱ्या घराच्या छपरावर दिवसभर बसल्या होत्या. खाली येईस्तवर घरातले सगळे सामान व बरेचसे घर नाहीसे झाले होते. आमच्या मामांच्या सासरेबुवा डेक्कन जिमखान्यावर राहत, त्यांचे सर्व घर वाहून गेले पण फक्त कुलूप लावलेला समोरचा दरवाजा उभा होता. य पुराच्या भयंकरपणाचे स्वरूप तेंव्हा फारसे कळले नाही.

    ReplyDelete
  8. Khup khup dhanyawad . June photos pahun tyaa welachi bhayanak Paristhiti laxat yete. Tya sumaras harawalele pune aajahi mazya sarakha pune kar shodhato aahe.

    ReplyDelete